जुनं ते सोनं

115

चित्रपट एकदम नवीन… तंत्रज्ञानही नवीनच… पण गाणी मात्र ६०,७० च्या दशकातील… का बरे असे?

रफी नाईट्स, किशोर नाईट्स, भुले लता, फिर वही आशा, आर.डी. बर्मन हिट्स अशा नावांचे अनेक कार्यक्रम गल्ली ते दिल्ली होत असतात. त्यावर असंख्य गायक-वादकांना ‘काम’ मिळते, पण अशा कार्यक्रमांत त्यांना स्वत:ची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळतेच असे नाही! हे कार्यक्रम केवळ जुन्या हिंदी मराठी गाण्यांच्या भांडवलावर हिट ठरत आहेत. ते कमी म्हणून की काय, अलीकडच्या चित्रपटातुनही जुनी गाणी नवा साज (?)चढवून सादर केली जातात, मात्र जुन्या गाण्यांच्या तुलनेत ती किती परिणामकारक ठरतात हा प्रश्नच आहे! डीजेप्रिय व्यक्ती वगळता ही गाणी सर्वसामान्य प्रेक्षकांना रुंजी घालू शकत नाही आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीनेही हा प्रयोग अयशस्वी ठरतो.

‘ओके जानू’ चित्रपटातलं ‘हम्मा हम्मा’ हे गाणं सध्या बरंच गाजतंय. एफएमवर सुद्धा या गाण्याला जास्त मागणी आहे. दिवसभरातून एकदातरी युटयुबवर अर्जुन आणि श्रद्धाचा या गाण्यावरील डान्स बघणारे त्यांचे फॅन्स आहेत. याचा अर्थ ए.आर.रहमानचे मूळ गाणे लोकांच्या विस्मरणात गेले का? तर नाही! ओके जानू मधले ‘हम्मा’ गाण्याकडे ‘नव्याची नवलाई’ म्हणून पाहिले जात असले तरी रहमानचे मूळ गाणे आजही लोकांची पहिली पसंती आहे.

आजचे आघाडीचे संगीतकार निलेश मोहरीर सांगतात, ‘हम्मा हम्मा’ हे गाणे मुळातच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आहे. त्यावर नव्या गाण्यात आणखी तंत्रज्ञानाचा भडीमार केल्याने ते फारसे श्रवणीय राहिले नाही. युटयुबवर अशा गाण्यांना जास्त विव्ह्ज मिळत असतील, तर ती केवळ लोकांची उत्सुकता असते. मात्र आपण त्या व्हिडीओखाली दिलेल्या कमेंट्स वाचल्या तर ९० टक्के लोकांना अशी गाणी नापसंत असल्याचे आढळेल. कारण अजूनही लोकांना नव्या आणि ओरिजनल गोष्टी आवडतात. काही वर्षांपूर्वी रिमिक्सचा ट्रेंड आला होता, पण त्यातलीही सगळीच हिट झाली नाहीत. माझी वैयक्तीक आवड म्हणाल तर मला सतत नवे प्रयोग करायला आवडतात. जुन्या गाण्यांना नव्याने संगीत देण्यापेक्षा नवीन गाण्यांना नवे संगीत देण्याकडे माझा नेहेमी कल असेल. आणि त्यातही एखाद्या दिग्दर्शकाने चांगली संधी दिली तर एक आव्हान म्हणून मला ते स्वीकारायला आवडेल.”

१९७५मध्ये जुली या चित्रपटाच्या गाण्यांसाठी संगीतकार राजेश रोशन यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचेच संगीत दिग्दर्शन असलेला ‘काबील’ चित्रपट आला, त्यात त्यांनी ‘जुली’ मधले  ‘दिल क्या करे जब किसी को’ हे तेव्हाचे रोमँटिक गाणे नव्या बाजात सादर केले. पण गाण्यात अपेक्षित रंग भरला नाही, असे रसिकांचे म्हणणे आहे.

शाहरुखने तर डॉन चित्रपटाचाच रिमेक केला, त्यात ‘खाई के पान बनारस वाला’ आणि हेलनचे ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ हे गाणे नव्या रूपात सादर करण्यात आले. चित्रपटात शाहरुख असल्याने कदाचित ती दोन्ही गाणी लोकांनी स्वीकारली असावीत, पण ती नंतर फार वाजवली गेल्याचे ऐकिवात नाही.

आपली प्रतिक्रिया द्या