धक्कादायक! पैशाच्या वादातून वृद्धाला रॉकेल टाकून पेटवले

24

सामना प्रतिनिधी । पाटोदा

पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील एका ७० वर्षीय वृद्धाला गाय विक्री केल्याचे पैसे का मागतो या कारणावरून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना रविवारी सकाळी घडली. गंभीररित्या भाजलेल्या वृद्ध शेतकऱ्यास त्याच्या नातेवाईकांनी तातडीने बीडच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आश्रुबा दशरथ नागरगोजे असे गंभीररित्या भाजलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चार दिवसापूर्वी आश्रुबा यांनी त्यांची गाय गावातील एका व्यक्तीस विकली होती. गाय घेणारा व्यक्ती चार दिवसानंतर पैसे देणार होता. रविवारी सकाळी आश्रुबा हे पैसे मागायला गेले असता सकाळीच पैसे का मागतो? असे म्हणत पैसे देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर आश्रुबा नागरगोजे यांनी मी गाय परत नेतो असे म्हणताच त्यांना रॉकेल टाकून पेटवून देण्यात आले. यात ते गंभीररित्या भाजले गेले असून कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान जखमी शेतकऱ्याने पोलिसांसमोर जवाब नोंदवला असून या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या