
‘वीज बिल अपडेट करा अन्यथा आज रात्रीपासून घरातला वीज प्रवाह बंद होईल,’ अशी भीती दाखवत अज्ञात भामटय़ांनी एका 80 वर्षीय वृद्धाला 1 लाख 73 हजार रुपयांचा ऑनलाइन चुना लावल्याची घटना कुर्ल्यात घडली. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीनचंद्र साळवे (80) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते घरी असताना त्यांच्या व्हॉटसअॅपवर वीज बिल भरण्याबाबतचा मेसेज आला, परंतु बिल भरणा केला असल्याचे साळवे यांनी सांगितले. दरम्यान त्यानंतर पुन्हा त्यांच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज आले व त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉल करून त्याने तो टाटा पॉवरमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे वीज बिल अपडेट न केल्यास आज रात्रीपासून घरातला वीजपुरवठा बंद होईल अशी भीती दाखवली. त्यानंतर साळवे यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून 12 रुपये पाठविण्यास सांगितले. शिवाय कॉलरने साळवे यांच्याकडून त्यांच्या डेबिट कार्डची माहिती घेतली. ती माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी साळवे यांच्या बँक खात्यातील 1 लाख 73 हजार रुपये वळते करून घेतले. साळवे यांनी त्यांना आलेल्या तीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते तिन्ही नंबर बंद आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळवे यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.