कुणी कुणाला कोरोना दिला? कनिका-प्रिन्स चार्ल्स भेटीचे फोटो व्हायरल; सत्य काय?

2922

बेबी डॉल गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली बॉलीवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याने ती चर्चेत आली आहे. हिंदुस्थानात कनिकाचा मुद्दा गाजत असतानाच इंग्लंडच्या रॉयल घराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर इंग्लंडमधून परतलेली कनिका आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या भेटीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. कुणी कुणाला कोरोना दिला? असा सवाल देखील या फोटोसह व्हायरल करण्यात आला आहे. मग काय चर्चांना उधाण आले.

प्रिन्स चार्ल्स आणि कनिका यांचे हस्तांदोलन करताना, गप्पा करताना असे फोटो दिसत आहेत. कोरोना प्रसाराची कारणे आणि फोटोतील ऍक्शन चर्चांना पुष्टी देत असले तरी सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे, कुणाला हे फोटो फॉरवर्ड करण्याआधी पडताळून पाहणे आवश्यक आहे. कनिका आणि प्रिन्स चार्ल्स यांची भेट झाली होती का? तर याचे उत्तर हो असेच येते. त्यामुळे फोटो खरा आहे. कोरोनाची लागण होण्याआधी कनिका ही युरोपातून परतली होती का? तर त्याचेही उत्तर हो असेच येते. त्यामुळे हे फोटो आणि त्यासोबत विचारण्यात आलेला प्रश्न खरा वाटतो. मात्र एवढ्यावर सत्यतेची पडताळणी पूर्ण होते का? तर त्याचे उत्तर नाही असे येते.

कारण त्या दोघांच्या भेटीचे हे फोटो आताचे आहेत की या पूर्वीचे हे तपासणे ही आवश्यक आहे. तशी तपासणी केली असता हे फोटो आताचे नाहीत तर पूर्वी झालेल्या भेटीचे असल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोना कुणी कुणाला दिला? हा नेटकाऱ्यांनी विचारलेला प्रश्न निराधार ठरतो. ही पोस्टही असत्य ठरते.

दरम्यान, प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना झाल्याचे कळल्यानंतर ते विलगिकरण कशात राहत आहेत. त्यांची तब्येत ठीक असल्याचे रॉयल परिवाराकडून सांगण्यात आले आहे. प्रिन्स यांची पत्नी कॅमिला यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

दुसरीकडे कनिकाची तिसरी टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली आहे. तिने इंस्टावरील आपल्या जुन्या पोस्ट देखील डिलिट केल्या आहेत. तिच्यावर लखनौ येथे उपचार सुरू आहेत.

विदेशातून परतल्यावर कनिकाने मोठी चूक केली होती. ग्राउंड स्टाफच्या मदतीने स्कॅनिंग टाळत देशात प्रवेश केला होता. 3-4 पार्ट्यांमध्ये ती सहभागी झाली होती. त्यात नेते, खासदार आणि मंत्र्यांचाही समावेश होता. कनिका ज्या ज्या लोकांच्या संपर्कात होती त्यापैकी 28 जणांच्ची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. सध्या सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील 14 दिवस तरी लोकांनी विलग राहणे गरजेचे आहे.

उत्तर प्रदेशच्या किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात 45 नमुने निगेटिव्ह निघाल्या आहेत. त्यापैकी 28 व्यक्तींचे नमुने हे कनिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे होते. इतर 17 नमूने हे आग्रा, फिरोजाबाद, अयोध्या आणि शहाजानपूरचे होते. ज्यांचे रिपोर्ट जरी निगेटिव्ह आले असले तरी त्यांना विलग राहण्याच्चे आदेश देण्यात आले आहेत. 14 दिवसांत कधीही कोरोनाचे लक्षणे दिसू शकतात. म्हणून आरोग्य विभागाने सर्वांना विलग राहण्यास सांगितले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्र्यांचे रीपोर्ट निगेटिव्ह

उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री प्रताप सिंह यांची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्या पत्नीचीही चाचणी निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांनी सिंह यांच्या सर्व कुटुबीयांना विलग राहण्यास सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या