पोलिसांनी दुर्लक्ष केलेल्या वृद्ध महिलेला संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिला न्याय

बऱ्याच वेळा पोलिसांकडून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. अनेक वेळा ‘तुमचे सिव्हिल मॅटर आहे, कोर्टात जा’ असे सल्ले दिले जातात. गुन्हा दाखल करण्यासदेखील टाळाटाळ केली जाते. संगमनेर पोलिसांकडेदेखील एक वृद्ध महिला न्याय मागण्यासाठी गेली होती; परंतु पोलिसांनी त्या महिलेची कुठलीही दखल घेतली नाही. मात्र, त्याच प्रकरणात संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी त्या वृद्ध महिलेला न्याय मिळवून दिला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या इंदुबाई रामनाथ पुंड यांना 25 फेब्रुवारीला त्यांच्या सुनेसह सुनेच्या बहीण आणि भावाने यांनी घरामध्ये घुसून मारहाण करीत घराबाहेर हाकलून लावले होते. या संदर्भात पुंड यांनी पोलीस ठाण्यात जात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे अंमलदारांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. घराबाहेर काढणाऱ्या लोकांनी मुलीचा आणि नातीचा मोबाईलदेखील काढून घेतला होता.

नातेवाईकांनी घराबाहेर काढल्यानंतर या महिलेने नातेवाईकांच्या मदतीने संगमनेरमधील ऍड. सीमा काळे-सातपुते यांची मदत घेतली. ऍड. काळे यांनीदेखील पोलीस निरीक्षकांना भेटून वृद्धेचे गाऱ्हाणे मांडले. निरीक्षकांनी कारवाईचे आश्वासन देऊनही पुढे कारवाई झाली नाही. दरम्यान, सोशल मीडियातून या घटनेची पोस्ट व्हायरलची दखल संगमनेरचे ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण अध्यक्ष तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी घेतली.

या वृद्ध महिलेसंदर्भात घडलेला घटनाक्रम जाणून घेत न्यायाधिकरणाने माता-पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह अधिनियम 2007 द्वारे याप्रकरणी चौकशी करत या वृद्ध महिलेच्या निवाऱ्याची तरतूद करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत या संदर्भात तातडीने आदेश पारित केले. या आदेशाच्या आधारे संगमनेरचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये या वृद्ध महिलेला तिच्या घराचा ताबा मिळवून दिला. तसेच, या महिलेच्या सुनेला समज दिली. सुनेने पुन्हा अशी कृती केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.