देणाऱ्याने देत जावे… गोरगरीबांसाठी शशिकला आजींनी दिली पेन्शनची रक्कम!

772

‘देणाऱयाने देत जावे, घेणाऱयाने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे!’ कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेने दातृत्व संस्कृती महती सांगितली. स्वत:च्या पलीकडे विचार न करणारा समाज मात्र या संस्कृतीपासून काहीसा दूर जाताना दिसत आहे. अशातच नव्या पिढीमध्ये दातृत्वाचा अनोखा आदर्श निर्माण करण्याचे काम शशिकला कोकर या वृद्धेने काल केले. पेन्शनवर उदरनिर्वाह करणाऱया या आजींनी चक्क एक लाख रुपये गोरगरीबांच्या सेवेसाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे दिले. याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ. तात्याराव लहाने यांनी आज फेसबुकवर पोस्ट लिहून शशिकला आजींची कहाणी सर्वांसमोर आणली. डॉ. लहाने यांनी सांगितले, काल मला शशिकला कोकर आजी भेटायला आल्या. याआधी त्या मला माझ्या काढदिकसाला भेटल्या होत्या. तेव्हा त्यांनी मला 20 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. पण त्यांचे पेन्शन फक्त 1200 असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी तो धनादेश बँकेत टाकला नाही. काल शशिकला आजी आपल्या मुलीसोबत आल्या आणि पुन्हा धनादेश घ्या असा आग्रह धरून बसल्या.

त्यावर डॉ. लहाने यांनी आजींचा धनादेश घ्यायला नकार दिला. आम्हाला बरेच जण मदत करतात. तुम्ही एका गरीब कुटुंबातून आला आहात, तर पैसे देऊ नका असे लहाने यांनी सांगितले. त्यानंतर आजींनी सांगितले की, मला माझ्या मिस्टरांची पेन्शन मिळते. ती महिन्याला 12 हजार आहे. मी चुकून 1200 सांगितले. आता माझा चेक घ्याच. पण शशिकला आजींनी हट्टच धरला की मी आता एक लाख रुपये देणार. ते घ्यावेच लागतील.

कुटुंबातील संस्कार महत्त्वाचे
खूप साध्या आणि लहान घरात राहणाऱया शशिकला आजींनी आपल्या पेन्शनचा अर्धा हिस्सा गोरगरीबांच्या उपचारासाठी दिल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली. चांगला विचार रुजण्यासाठी शिक्षण किंवा श्रीमंतीच असावी लागते असे नाही. लहानपणीचे कुटुंबातील संस्कार खूप महत्वाचे असतात. शशिकला यांच्यासारखी माणसे समाजात असल्याने समतोल साधला जात आहे. अशा कर्तव्यनिष्ठ आई समाजाला मार्गदर्शक ठराव्यात अशा भावना डॉ. लहाने यांनी व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या