मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या नावाने जेष्ठाला दीड लाखांचा गंडा

मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने जेष्ठाला फ्री म्युच्युअल स्कीमच्या नावाखाली 1 लाख 43 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला.

ही घटना 2 एप्रिल ते 14 एप्रिलमध्ये घडली. याप्रकरणी हरमितकौर राठोड (वय 62, रा. औंध रस्ता) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी हरमीतकौर कुटूंबियासह औंध रस्ता परिसरात राहायला आहेत.

2 एप्रिलला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. सिनीअर सिटीझनसाठी फ्री म्युच्युअल स्कीम असल्याचे भासवून त्यांना मेसेज पाठविला.

पॉलिसीचा उरलेला 47 हजार 500 रूपयांचा हप्ता जमा केल्यास त्वरित 2 लाख 40 हजार रूपये मिळतील असे सांगून पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर 95 हजारांचा हप्ता जमा केल्यास 7 लाख रूपये मिळतील असे सांगून दोनदा त्यांच्याकडून 1 लाख 43 हजार रूपये गुगल पे करून घेउन फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शफील पठाण तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या