साहित्याचे नोबेल ओल्गा तोकार्झुक, पीटर हँडके यांना

स्वीडिश अकादमीने साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘नोबेल’ पुरस्काराची घोषणा आज स्टॉकहोम येथे केली. 2018 साठी साहित्याचा नोबेल पुरस्कार पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकार्झुक यांना तर 2019 सालचा पुरस्कार ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडके यांना जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी लैंगिक छळाच्या प्रकरणांमुळे साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदा दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकाच वेळी जाहीर करण्यात आले.

57 वर्षीय ओल्गा या पोलीश लेखिका, विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या त्यांच्या पिढीतील व्यावसायिकदृष्टय़ा सर्वाधिक यशस्वी लेखकांपैकी एक आहेत. 2018मध्ये त्यांना ‘फ्लाइटस्’ या कादंबरीसाठी ‘मॅन बुकर’ ने सन्मानित करण्यात आले होते. हा गौरव प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत.

ऑस्ट्रियाचे कादंबरीकार आणि अनुवादक पीटर हँडके (76) यांनी आपल्या आईच्या आत्महत्येवर ‘द सॉरो बियॉड ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले होते. पीटर यांनी चित्रपटांसाठी लेखनही केले आहे. त्यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाला 1978 मध्ये कान फेस्टिव्हलमध्ये आणि 1980 मध्ये गोल्ड ऍवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. तसेच 1975 मध्ये त्यांना पटकथा लेखक म्हणून ‘जर्मन फिल्म ऍवॉर्ड इन गोल्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक प्रभावशाली लेखक म्हणून ते नावारूपाला आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या