पाकिस्तानी महिलांनी सौदी अरेबियाच्या पुरुषांची काढली छेड, झाली जेल

1727

सौदी अरेबियन पुरुषांवर टीप्पणी करणं दोन पाकिस्तानी महिलांना चांगलच महागात पडलं आहे. यातील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला सौदी अऱेबियात एका ब्युटी पार्लरमध्ये ब्युटीशियन म्हणून काम करते. सौदी पुरुषांची छेड काढतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये आरोपी महिला व तिची मैत्रिण कारमध्ये असून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सौदी पुरुषांकडे बघत त्या हसत आहेत. यातील एक महिला अरबी भाषेत काहीतरी बोलताना या व्हिडीओत दिसत आहे. ‘जर त्याचा अबाया सुंदर असता तर मी त्याच्याबरोबर फ्लर्ट केले असते’ असा तिच्या बोलण्याचा अर्थ होतो. असे पोलिसांनी सांगितले आहे. महिलेचा हा व्हिडीओ स्नॅपचॅटवर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी महिलेच्या या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोन्ही महिलांनी तिथून पळ काढत मदिना गाठले. पण तिथे त्यातील आरोपी महिलेला अटक करण्यात आली.

दरम्यान, अटक होण्याआधी संबंधित महिलेचा अजून एक व्हिडीओ ट्विटर व्हायरल झाला. ज्यात ती सगळ्यांची जाहीर माफी मागत आहे. तसेच ती रडत असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश्य नव्हता असे सांगत असल्याचे दिसत आहे. पण यावर यूजर्सनी नाराजी व्यक्त केली असून तिला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच तिने सौदी अरेबियाच्या कायद्याचे उल्लंघन केल्याने तिला अटक केल्याबद्दल काहीजणांनी समाधानही व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या