एमसीएमध्ये कोरोनाचा शिरकाव, 15 कर्मचारी बाधित झाल्याने कार्यालय 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

ओमायक्रॉनचा संसर्गवेग जास्त असल्याने कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. एमसीए कार्यालयातील 15 कर्मचारी हे बाधित झाले असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी तसेच इनडोअर क्रिकेट अकॅडमीच्या कर्मचाऱ्यांनी देखील काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 15 कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यालय पुढील 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत एकाच दिवशी रुग्णसंख्या वीस हजार पार!

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने धोक्याची पातळी ओलांडली असून एकाच दिवसात तब्बल 20 हजार 181 रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूही झाला आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीने महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याधीआच दिवसाला 20 हजारांवर रुग्ण आढळल्यास ‘लॉकडाऊन’ होऊ शकते असा इशारा दिलेला असल्याने मुंबईसाठी टेन्शन निर्माण झाले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज तब्बल 20 ते 25 टक्के रुग्णवाढ होत आहे. डिसेंबरअखेरपासूनच ही रुग्णवाढ सुरू झाली असून जानेवारीत तर आकड्याने उसळी घेतली आहे. 4 जानेवारी रोजी 10 हजार 860 इतके रुग्ण नोंदवले गेले होते. यामध्ये एकाच दिवशी सुमारे चार हजार रुग्णांची वाढ होऊन रुग्णसंख्येने बुधवारी 15 हजारांचा टप्पा पार केला. ही वाढ कायम राहिली असून यात आज आणखी पाच हजारांची वाढ होऊन रुग्णसंख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला. मुंबईत करण्यात आलेल्या 67 हजार 487 चाचण्यांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 853809 वर गेली आहे. तर 4 मृत्यूंमुळे मृतांचा आकडाही 16388 झाला आहे. दरम्यान, एकाच दिवसांत 20 हजारांवर रुग्ण आढळले असले तरी यातील 85 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर यातील 1700 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर 106 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. रुग्णवाढीची टक्केवारी 0.99 वर गेली आहे.

बरे होण्याच्या प्रमाणात झपाट्याने घट

  • रुग्णवाढ होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले आहे. 30 डिसेंबर 2021 रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मुंबईत 96 टक्के होते. मात्र 6 जानेवारी 2022 रोजी हेच प्रमाण 88 टक्क्यांवर आले आहे.
  • दरम्यान, मुंबईत आज एकाच दिवसांत 20 हजारांवर रुग्ण आढळले असताना 17154 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 5 लाख 71 हजार 504 झाली आहे.
  • रुग्णवाढीमुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही झपाट्याने कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी केवळ 70 दिवसांवर आला आहे. 22 डिसेंबर रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी 1962 दिवस होता, तो आज 6 जानेवारी रोजी थेट 70 दिवसांवर आला आहे.