CWG 2022 हिंदुस्थानची पाचवी बेस्ट कामगिरी, पदकतालिकेत ‘नंबर वन’चे स्वप्न आजही अधुरेच

इंग्लंडमधील बर्मिंगहॅमध्ये येथे झालेल्या 22 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. शूटिंगचा समावेश नसतानाही हिंदुस्थानने यंदा दमदार खेळ केला. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हिंदुस्थानने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकासह एकूण 61 पदक जिंकली. या कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानने पदकतालिकेमध्ये चौथे स्थान पटकावले.

कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील हिंदुस्थानची ही पाचवी सर्वोत्तम कामगिरी आहे. हिंदुस्थानने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सर्वाधिक 101 पदकांची कमाई 2010 मध्ये केली होती. त्यावेळी दिल्लीमध्ये ही स्पर्धा पार पडली होती. या कामगिरीमुळे हिंदुस्थान पदकतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता. परंतु हिंदुस्थानचे नंबर वन होण्याचे स्वप्न आजही अधुरेच आहे.

एकदाच सत्तरी पार

कॉमनवेल्थ गेम्समध्ये हिंदुस्थानने फक्त एकदाच 70 हून अधिक पदकांची कमाई केली आहे. 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हिंदुस्थानने ही कामगिरी केली होती. पण हिंदुस्थानचा संघ एकदाही नंबर एकवर पोहोचलेला नाही. त्यामुळे यापुढील कॉमनवेल्थ गेम्समध्ये नंबर एकवर पोहोचण्याचे आव्हान हिंदुस्थानपुढे असणार आहे.

हिंदुस्थानची सर्वोत्तम कामगिरी 2010 मध्ये झाली होती. तर 2002 च्या मॅनचेस्टर कॉमनवेल्थ गेम्समध्ये हिंदुस्थानने 30 सुवर्णपदकांसह 69 पदकं जिंकली होती. त्यावेळी हिंदुस्थानचा संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. 2018 मध्ये हिंदुस्थानने 66 पदकं जिंकली होती.

कॉमनवेल्थ गेम्समधील हिंदुस्थानची सर्वोत्तम कामगिरी

2010 दिल्ली – 38 सुवर्णपदकांसह 101 पदकं, पदकतालिकेमध्ये दुसरे स्थान
2002 मॅनचेस्टर – 30 सुवर्णपदकांसह 69 पदकं, पदकतालिकेमध्ये चौथे स्थान
2018 – गोल्डकोस्ट – 26 सुवर्णपदकांसह 66 पदकं, पदकतालिकेमध्ये तिसरे स्थान
2014 ग्लासगो – 15 सुवर्णपदकांसह 64 पदकं, पदकतालिकेमध्ये पाचवे स्थान
2022 बर्मिंगहॅम, 22 सुवर्णपदकांसह 61 पदकं, पदकतालिकेमध्ये चौथे स्थान