प्रेक्षकांशी जोडला गेलो

37

>> नमिता वारणकर

ओमप्रकाश शिंदे गुणी कलाकार. गाजलेल्या मराठी मालिकांनंतर आपल्या पहिल्या व्यावसायिक नाटकाविषयी सांगतोय….

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं नाटक
प्रेक्षकांचं मनोरंजन करत करत सुख, दुःख अशा भावनांचे अनेक पैलू साकारत यातील प्रत्येक प्रसंग पुढे पुढे घडत राहतात. त्यामुळे नाटक सुरू झाल्यापासून त्याचा शेवट होईपर्यंत ते कसं हसवतं, रडवतं, खिळवून ठेवतं हे प्रेक्षकांना कळतही नाही. नाटकातली ही गोष्ट मला आवडली. हा अनुभव घेण्यासाठी ‘अशी ही श्यामची आई’ हे नाटक पाहावं, असं ओमप्रकाश आवर्जून सांगतो.

आई-मुलाच्या नात्यात घडणाऱया गमती जमती अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडणारं ‘अशी ही श्यामची आई’ हे नाटक नुकतंच व्यावसायिक रंगभूमीवर सादर झालं. रक्ताच्या नात्याची हृदयस्पर्शी गुंफण असलेलं सुयोगचं हे ८६वं नाटक. या नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे ‘का रे दुरावा’, ‘खुलता कळी खुलेना’ या प्रसिद्ध मालिकांमधील अभिनेता ओमप्रकाश शिंदे या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

आपल्या पहिल्या नाटकाविषयी तो सांगतो की, यापूर्वी पुण्यात प्रायोगिक नाटक करायचो. तरीही पहिलं व्यावसायिक नाटक असल्यामुळे दडपण होतंच.‘खुलता कळी खुलेना’ मालिकेनंतर दोन-तीन वेगवेगळ्या विषयांवरील नाटकांसाठी विचारणा झाली. त्यापैकी ‘अशी ही श्यामची आई’ नाटकाची संहिता आणि त्यातील माझी व्यक्तिरेखा मला खूपच आवडली. एक वेगळ्या प्रकारची भूमिका करण्याची संधी यामुळे मला मिळाली म्हणून हे नाटक स्वीकारले.

या नाटकात ओमप्रकाश श्याम नावाचं मध्यमवर्गीय पात्र साकारतोय. ज्याची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाही. आईला फिट्स येतात. त्यामुळे घर आणि आई अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्याच्यावर आहेत. त्यामुळे त्याच्या वागण्यात, प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देण्यात, ती समजून घेण्यात फरक आहे. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत आई आणि मुलातलं प्रेम एका वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अतिशा नाईक या नाटक, मालिका आणि सिनेमा असा सर्वच माध्यमांचा मोठा अनुभव असलेल्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक भूमिकेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती वेगळा आहे हे शिकायला मिळालं. त्यामुळे नाटक करताना मजा येत आहे, असं त्याचं म्हणणं आहे.

मुळात हे नाटक एकांकिकेतून तयार झालंय. नाटकाचा कालावधी एकांकिकेपेक्षा जास्त असतो. त्यामुळे नाटक आणि एकांकिकेचं मिश्रण होईल अशी भीती होती, पण तसं काही घडलं नाही. कारण लेखक स्वप्नील जाधव यांनी ज्या घटना एकांकिकेत नव्हत्या त्या नाटकात सुयोग्य पद्धतीने बांधल्या आहेत आणि दिग्दर्शक स्वप्नील बारसकर यांनी सर्व कलाकारांकडून त्याचं योग्य पद्धतीने सादरीकरण करवून घेतल्यामुळे एकांकिकेतून नाटक साकारलंय असं प्रेक्षकांना वाटत नाही, असं तो म्हणतो.

मालिकांचा प्रेक्षकवर्ग नाटकाकडे
मालिका आणि नाटक यापेक्षा जास्त काय भावतं असं विचारता तो सांगतो की, मालिका आणि नाटक ही दोन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत. दोन्हींची गंमत वेगळी असते. मालिकेत कॅमेरा असतो, रिटेक असतात. एका दिवसात बऱ्याच गोष्टी साध्य कराव्या लागतात. त्यामुळे संपूर्ण दिनक्रम व्यस्त असतो, तर नाटक हे जिवंत प्रेक्षकांसमोर घडत असतं. त्यामध्ये रिटेक नसल्यामुळे भूमिका साकारताना जागरुक राहावं लागतं. संपूर्ण तयारीनिशीच प्रेक्षकांसमोर कलाकाराला जावं लागतं. असं असलं तरीही मालिकेमुळे आपण घराघरांत पोहोचतो. त्यामुळे ओळख निर्माण होऊन ज्यांनी आधी कधीही नाटक पाहिलं नाही असे प्रेक्षकही नाटक पाहायला येतात. प्रेक्षकवर्ग नाटकाकडे वळवण्यासाठी हा फायदा होतो. आपला अनुभव सांगतात. ‘अशी ही श्यामची आई’ने हा अनुभव मला दिला.

आपली प्रतिक्रिया द्या