ऑन डय़ुडी असताना पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; मुलुंड येथील घटना

ऑन डय़ुटी असतानाच एका अंमलदाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुलुंड येथे घडली. रामा अर्जुन महाले (48) असे त्या अंमलदाराचे नाव होते.

मुलुंड पोलीस ठाणे येथे महाले हे कार्यरत होते.  रविवारी महाले हे पीटर वन मोबाईल वाहनावर दिवसपाळी चालक म्हणून कर्तव्यावर हजर होते.  पिटर वन मोबाईलसह महाले हे मुलुंड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना कालिदास नाटय़ मंदिरजवळ साधारण संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना लगेच अग्रवाल हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टर रामा अर्जुन महाले यांच्यावर उपचार करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.