शिवसेनेच्या वतीने विलेपार्ले येथे आयोजित ‘महा रोजगार’ मेळाव्यात तब्बल चार हजार बेरोजगार तरुणांना ‘ऑन द स्पॉट’ नोकरी मिळाली, तर 4500 उमेदवारांची पुढच्या राऊंडसाठी व प्रक्रियेसाठी आमंत्रित करण्यात आले. या मेळाव्यात तब्बल 12 हजार बेरोजगारांनी सहभाग घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या महा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विलेपार्ले येथील बालाजी रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये आज मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांच्या विधान परिषद निवडणूक काळातील वचनपूर्तीनिमित्त शिवसेनेचा भव्य ‘महा नोकरी मेळावा’ पार पडला. उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात 15 तरुणांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली.
या महा रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने विमानतळासमोरील सहारा हॉटेल परिसरात बेरोजगार युवकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरात सर्वत्र रोजगार मेळाव्याचे बॅनर आणि शिवसेनेचे भगवे झेंडे लागलेले होते. मेळाव्यासाठी इच्छुकांनी गुगल फॉर्मवर पूर्वी नोंदणी केलेली होती. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, युवा सचिव वरुण सरदेसाई, आमदार रमेश कोरगावकर, भारतीय कामगार सेनेचे संजय कदम, माजी आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील प्रभू, सुनील शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
आमचे स्टॉल रोजगाराचे तर मिंधेंचे महाराष्ट्र विकण्याचे स्टॉल – आदित्य ठाकरे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून 6.5 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. त्यातले बहुतांश उद्योग मिंधेंनी गुजरातमध्ये पाठवले. आपण नोकरी देण्यासाठी स्टॉल लावले, मिंधेनी मात्र महाराष्ट्र विकण्यासाठी स्टॉल लावले आहेत, असा टोला लगावतानाच आपले सरकार लवकर येणार असून सरकार आल्यानंतर दर चार महिन्यांनी नोकरीचे स्टॉल लावून प्रत्येक जिह्यातील तरुणांना रोजगार देऊ, असे वचन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिले.
आता दरवर्षी रोजगार मेळावा – अॅड. अनिल परब
राज्यात मागील अडीच वर्षांत बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या मेळाव्यातून तरुणांना काम नाही हे दिसून येत आहे. 134 कंपन्या इथे नोकरी देण्यासाठी आल्या आहेत. 160 स्टॉल्स मुलाखतीचे आहेत. आज 12,000 युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे. सत्ता नसताना नोकरी देण्याचे काम आपण करत आहोत. रोजगार मेळावा आयोजित करणार म्हणून पदवीधर निवडणुकीत वचन दिले होते. त्याला जागण्यासाठी दरवर्षी नोकरी मेळावा आयोजित केला जाईल, असे मेळाव्याचे संयोजक आमदार अॅड. अनिल परब यांनी सांगितले.