
मोठा गाजावाजा करून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आज सोमवारपासून नाफेड कांदा खरेदीसाठी उतरेल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, निफाड उपआवार वगळता नाफेड, एनसीसीएफमार्फत एकही केंद्र सुरू न झाल्याने घोषणेचा फज्जा उडाला. आतापर्यंत अवघ्या ३४ अंमलबजावणी संस्थांनी परवाने घेतले, प्रत्यक्ष कुणीही बाजार समितीत दाखल झालेले नव्हते. दरम्यान, व्यापाऱ्यांकडून १६०० ते २४०० दराने खरेदी सुरू असताना १५८० रुपयांना कोण कांदा विकेल? असा संतप्त सवालही उत्पादकांनी सरकारला केला आहे.
नाफेड व एनसीसीएफने बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया रविवारपर्यंत पूर्ण करून सोमवारपासून प्रत्यक्ष खरेदीसाठी उतरावेत, असे निर्देश देण्यात आले होते. १ हजार ५८० रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करावा, तो गोदामात नेण्यासाठी वाहतूक व मजुरीचा खर्चही नाफेडने करावा, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नये, त्यांना ७२ तासांत पैसे द्यावेत, असेही सांगितले होते. प्रत्यक्षात आज सोमवारी कुठल्याच मोठ्या बाजार समितीत नाफेडचे केंद्र सुरू नव्हते.
शेतकरी कमी दरात कांदा देणारच नाही – होळकर
जिल्ह्यातील कुठल्याही बाजार समितीत आज नाफेड, एनसीसीएफचे प्रतिनिधी हजर झालेले नव्हते. मुळात त्यांचा दर कमी आहे. त्यांच्याकडे नोंदणी करायची, खरेदीनंतर महिनाभराने ते पैसे देतील, असेच जर असेल तर शेतकरी नाफेडला कांदा देणारच नाहीत, अशी प्रतिक्रिया लासलगाव व मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी दिली. किमान तीन हजार रुपये भाव जाहीर करा, तरच शेतकरी पुढे येतील, असे त्यांनी सांगितले.

























































