उरणच्या वाहतूककोंडी विरोधात तरुणाई रस्त्यावर

483

उरणच्या रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून होत असलेल्या वाहतूककोंडीच्या निषेधार्थ शुक्रवारी वाहनांची तोडफोड झाल्यानंतर या भागातील तरुणांनी आज करळफाटा येथे जोरदार निदर्शने केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या वाहतूककोंडीवर लवकर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील भूमिपुत्रांनी यावेळी दिला. त्यामुळे जेएनपीटी प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

रस्ते, पार्किंग द्या!

जेएनपीटीकडे जाणाऱया वाहनांचा लोड सध्या एकाच रस्त्यावर आला आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होती. रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहने मुंगीच्या वेगाने चालतात. पार्किंग नसल्यामुळे वाहनांना रस्त्यावर ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे चांगले रस्ते आणि पार्किंग तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मोटार मालक संघाचे अध्यक्ष भरत पोखरकर आणि सचिव गणेश शिंदे यांनी जेएनपीटी प्रशासनाकडे केली आहे.

वर्षभरापासून आम्र मार्ग, जेएनपीटी मार्ग आणि गव्हाणफाटा-चिरनेर या मार्गांवर दररोज वाहतूककोंडी होत आहे. अवजड वाहने ताशी पाच किलोमीटरच्या वेगाने मार्गक्रमण करत असल्याने या भागातील स्थानिक नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी तीन-तीन तास लागतात. या वाहतूककोंडीत एखादी रुग्णवाहिका अडकली तर रुग्णांची  रुग्णवाहिका अडकल्यामुळे अनेक रुग्णांना आपल्या प्राणालाही मुकावे लागले आहे.  हे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे शुक्रवारी पहाटे काही तरुणांनी रस्त्याला कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर आज शेकडो तरुण करळफाटा येथे जमा झाले. त्यांनी काळे टी-शर्ट घालून जेएनपीटी प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर त्यांनी या वाहतूककोंडीच्या निषेधार्थ मोटारसायकल रॅली काढली. नंतर त्यांनी उरण तहसील कार्यालयावर धडक देऊन ही वाहतूक कायमची हटवा, अशी मागणी केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या