कश्मीरमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा

34

सामना ऑनलाईन। श्रीनगर

हिंदुस्थानी लष्कराने मध्य कश्मीरमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यादरम्यान स्थानिकांनी पाकिस्तान आणि एका दहशतवाद्याचा जयजयकार केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कश्मीर येथे क्रिकेट प्रीमीयर लीगमध्ये हिंदुस्थानचा माजी कर्णधार एम एस धोनी समोरही स्थानिकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या.

मध्य कश्मीरमधील बडगाम आणि ओमपारा येथे लष्कराच्या ५३ राष्ट्रीय रायफल टीमतर्फे कश्मीर प्रीमीयर लीग या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक क्रिकेट बघण्यासाठी आले होते. अंतिम सामना संपल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा सुरू होताच अनेकांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तर काही जणांनी अल कायदा या दहशतवादी संघटनेचा कश्मीरमधील म्होरक्या झाकिर मूसाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरूवात केली.

२६ नोव्हेंबर रोजी कश्मीरमधील कुंजार भागात चिनार क्रिकेट प्रिमीयर लीगमध्ये मुख्य अतिथी म्हणून हिंदुस्थानचा माजी कर्णधार एम एस धोनीला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळीही त्याच्यासमोरही स्थानिकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या व पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रीदीचा जयजयकार केला होते. क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा धोनी व आफ्रिदी यांच्यात वाद होत असत. यामुळे धोनीला डिवचण्यासाठीच स्थानिकांनी आफ्रीदीचा जयजयकार करत पाकिस्तानचा जयजयकार केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या