परिवहनच्या ५१० कर्मचार्‍यांना मिळणार दीड कोटीचा थकीत महागाई भत्ता

ठाणे – परिवहनच्या सेवेत १९९४ पासून काम करीत असलेल्या हंगामी कर्मचार्‍यांचा सुमारे दीड कोटी रुपयांचा महागाई भत्ता प्रशासनाच्या बेफिकीरपणामुळे थकला आहे. महापालिकेच्या लेखा विभागाकडे हा महागाई भत्ता मिळण्याबाबत प्रयत्न न केल्याने कर्मचार्‍यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व कर्मचार्‍यांना निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचे आदेश परिवहनचे सभापती दशरथ यादव यांनी आज प्रशासनाला दिले.

 

आज झालेल्या परिवहनच्या बैठकीत कर्मचार्‍यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत शिवसेनेसह सर्व सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. ज्या वाहक व चालकांच्या जोरावर परिवहनचा गाडा सुरू आहे त्यांच्या गरजांकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे सांगण्यात आले. गेली अनेक वर्षे ५१० कर्मचारी काम करीत असून त्यांच्याबाबत सहानुभूती का दाखविली जात नाही, असा खडा सवाल शिवसेनेचे सदस्य अनिल भोर यांनी केली. परिवहनला महापालिकेकडून दरमहा २ कोटी ७५ लाख रुपये अनुदान मिळाले तर आर्थिक प्रश्‍न सुटेल असेही त्यांनी नमूद केले. परिवहन सदस्य प्रकाश पायरे, राजेंद्र महाडिक यांनीदेखील कर्मचार्‍यांना थकीत महागाई भत्ता मिळालाच पाहिजे असे ठासून सांगितले. परिवहनचे रोजचे उत्पन्न २२ लाख एवढे असतानाही कर्मचार्‍यांची थकबाकी का ठेवता, असा सवाल सदस्यांनी केला.

परिवहनचे सभापती दशरथ यादव यांनी ५१० कर्मचार्‍यांची महागाई भत्त्यापोटी असलेली थकबाकी लवकरात लवकर प्रशासनाने द्यावी असे आदेश दिले. ते म्हणाले की, यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीदेखील चर्चा करण्यात आली असून थकबाकी देण्याबाबत परिवहन प्रशासनाने लेखा विभागाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा असेही आदेश यादव यांनी दिले. शिवसेना परिवहन कर्मचार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून त्यांची हक्काची देणी दिली नाहीत तर वेळप्रसंगी आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला.

मराठीतून एमए केलेल्या १० कर्मचार्‍यांना पदोन्नत्ती द्या!
मराठीमधून एमए केलेल्या कर्मचार्‍यांना दोन वेतनवाढ मिळावी असा ठराव महासभेने काही वर्षांपूर्वी केला होता. परिवहनमधील १० कर्मचार्‍यांनी मराठीमधून एमएची पदवी घेतली असून त्यांना अद्यापि ही वेतनवाढ देण्यात आलेली नाही. शिवसेनेचे राजेंद्र महाडिक यांनी याबाबतचा गौप्यस्फोट करताच परिवहनचे व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्‍वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या