मुंबईहून टाकळी हाजीत आलेल्या एकाला कोरोनाची लागण

402

मुंबई येथून शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील साबळेवाडीत आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला सतत ताप येत असल्याने त्याचे स्वॅब पुण्याच्या औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप बिक्कड यांनी दिली आहे. यामुळे टाकळी हाजी परिसरात खळबळ उडाली आहे. तर साबळेवाडी परिसर प्रशासनाने सिल केला आहे.

ही व्यक्ती हा कामोठे (नवी मुंबई ) येथून 4 तारखेला कुंटुबामधील तीनजणांना घेऊन आले होते. आलेल्यांपैकी प्रमुख व्यक्तीला तीन दिवसानंतर ताप येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी बुधवारी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाला असून तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना होमक्वांरटाईन करण्यात आले होते. घरातील सदस्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. बिक्कड यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी म्हसे बुद्रुक येथील मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. ती व्यक्ती आता कोरोनामुक्त झाली आहे. कोरोनामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः ची व कुटुबांची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या