खेड शहरासाठी एक कोटी रुपयांचा निधी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

महापुरामुळे चिखलमय झालेल्या खेड शहराची साफसफाई करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी शहराच्या साफसफाईसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी नगरविकास मंत्रालयाकडे केली होती.


राज्याचे नगरविकास मंत्री मंगळवारी पुरपरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर शिंदे यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुरामुळे उद्धवस्त झालेल्या व्यापाऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.शासकिय मदतीबाबत बोलताना ते म्हणाले, कोकणात आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या व्यापाऱ्यांना पुन्हा नव्याने आपला व्यवसाय उभा करण्यासाठी जी मदत लागेल ती मदत करण्यासाठी शासन या व्यापाऱ्यांची पाठीशी ठामपणे उभे राहिल. विमा कंपन्यांशी देखील संपर्क साधून व्यापाऱ्यांना विमा क्लेम देण्याबाबत योग्य त्या सुचना केल्या जातील असे आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिले. खेड येथे पुरग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील केले. यावेळी त्यांच्या सोबत दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम हे देखील उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या