गडचिरोलीत पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक ठार

फाईल फोटो

गडचिरोलीतील मौजा हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. नक्षलवाद्यांचा हल्ला पोलिसांनी परतवून लावल्यामुळे घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. यामध्ये समीर ऊर्फ साधू लिंगा मोहंदा हा नक्षलवादी ठार झाला.

मौजा तोडगट्टा येथील जनआंदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरिकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडले होते. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आणखी फूस लावून आंदोलन कायम ठेवण्याच्या हेतूने तसेच पोलिसांद्वारे राबविण्यात येणाऱया नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवाद्यांकडून आखली जात असल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकांच्या जवानांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. मात्र आज सकाळी 10 च्या सुमारास हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे 60 ते 70 नक्षलवाद्यांनी बीजीएल व इतर दारूगोळय़ाच्या सहाय्याने पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. ही चकमक सुमारे 30 ते 45 मिनिटे चालू होती. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.