कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने डॉक्टरसह 7 जण क्वारंटाईन

3253

कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रोटेस्टची शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या पाथरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरसह सातजणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेने कोपरगावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्या पथकाने तत्काळ खाजगी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना केल्या. पाथरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आला असताना आजूबाजूला असलेल्या सहा रुग्णांना बोलविण्यात आले असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

रुग्णालयातील या डॉक्टरचे आणि सहा रुग्णांचे स्वॅबचे नमुने नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. या खाजगी दवाखान्यात रुग्णालयातील बाकीच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई सुरक्षा कवच घातल्यामुळे ते बचावले आहेत. सोमवारी पाथरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील 65 वर्षाची एक व्यक्ती कोपरगाव येथील एका खाजगी दवाखान्यात प्रोटेस्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी आली होती. त्याची तपासणी करताना संबंधित डॉक्टरांनी त्याला कोरोना तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने नाशिकमध्ये स्वॅब तपासणी करू असे सांगितले. त्यामुळे त्यांना सोडण्यात आले. मंगळवारी नाशिक केंद्रातून ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच बुधवारी रुग्णाची तपासणी करणाऱ्या कोपरगाव येथील डॉक्टरला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर त्यावेळी रुग्णालयात असलेल्या आजूबाजूच्या बाहेरगावच्या 6 रुग्णांना तालुका प्रशासनाकडून बोलविण्यात आले असून संध्याकाळी त्यांना कोपरगाव येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या