कोरोनावर मात केलेल्यांसाठी लसीचा एक डोसही पुरेसा, ब्रिटनमधील संशोधकांचा दावा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात विविध संशोधने सुरू आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेली लस किती परिणामकाऱवक ठरेल याबाबतही अभ्यास व संशोधन सुरू आहे. ब्रिटनमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ज्या व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे त्यांच्यासाठी लसीचा एक डोसही पुरेसा असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरोना विषाणूविरोधात अॅण्टीबॉडी तयार करण्यासाठी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते. मात्र ब्रिटनमधील इम्पिरिअल कॉलेज, क्वीन मेरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमध्ये लसीच्या एका डोसमुळे शरीरात आवश्यक तेवढय़ा अॅण्टीबॉडीज विकसित होत असल्याचे आढळून आले आहे.

कोरोनाच्या दक्षिण आफ्रिका वेरिएंटवर हे संशोधन केले होते. हेच संशोधन ब्राझील आणि हिंदुस्थानातील वेरिएंटवरही लागू होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्रिटनमधील एका वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. लसीच्या एकाच डोसमुळे त्यांच्या शरीरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुरेशी प्रतिकारकशक्ती निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

संशोधनासाठी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा वापर

या संशोधनासाठी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा वापर करण्यात आला. ज्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यामध्ये कोरोनाची अतिशय किरकोळ स्वरूपाची लक्षणे होती. काहीजणांमध्ये ही लक्षणेही नव्हती. त्यातील लसीचा एक डोस पेंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या वेरिएंटविरोधात प्रभावी आढळून आला. ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती त्यांच्या शरीरात पहिल्या डोसनंतर रोगप्रतिकारकशक्ती कमी होती आणि त्यांना बाधा होण्याचा धोका होता.

ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती अशांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. कोरोनाचे नवीन वेरिएंट, स्ट्रेन समोर येत आहेत. त्यामुळे अधिकाधिक जणांनी लस घेण्याची आवश्यकता असल्याचे इम्पिरिअल कॉलेजचे प्राध्यापक रोजमेर बॉयटन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या