लातूरमधील तीन गावांच्या माळरानावर शंभर एकर क्षेत्राला आग

चापोली व अजनसोंडा गावाच्या सीमेवरील माळरानावर अचानक आग लागली. जोराचा वारा वाहत असल्याने आग काही क्षणातच परिसरात पसरली. यावेळी ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली व नुकसान टाळले.

चापोली, अजनसोंडा व मष्णेरवाडी या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या माळरानावर अचानक आग लागली. दूरवरून आगीचे लोट दिसू लागल्यावर तेथील शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना बोलावून घेतले. तोपर्यंत आगीचा भडका मोठ्या प्रमाणावर वाढला होता. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणल्याने आग जंगलामध्ये पसरली नाही त्यामुळे मोठे नुकसान टळले.

मात्र तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा जमा करून ठेवलेल्या कडब्याची बनिमी, गुळी व गवत या वस्तूंना आग लागली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. आग लागल्याचे कळताच तहसीलदार शिवानंद बिडवे, नायब तहसीलदार बालाजी चितळे, वनरक्षक प्रल्हाद घुले, तलाठी बालाजी हक्के, अविनाश पवार यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

चापोली माजी पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार, सिराज देशमुख, सुरेश शेवाळे, सरफराज देशमुख, अमोल उळागडडे, प्रकाश शेवाळे, मिलिंद सरकाळे, आदींनी वेळीच आग रोखण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग 11० एकर क्षेत्रावर पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंडळ अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून याचा पंचनामा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी तलाठी बालाजी हक्के यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या