शांतता! रमजान सुरू आहे…

22

सामना ऑनलाईन । श्रीनगर

रमजानचा पवित्र महिना असल्याने केंद्रातील मोदी सरकारने कश्मिरात शांततेची कबुतरे उडवली आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराने शस्त्रास्त्र म्यान केली असली तरी पाकिस्तानी बंदुका मात्र सीमेवर आग ओकत आहेत. गुरुवारी रात्री पाकडय़ांनी केलेल्या तुफान गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. या धुमश्चक्रीत चार नागरिकही ठार झाले असून, सहा जण जखमी झाले आहेत.

रमजानची पर्वणी साधून केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-कश्मिरात शस्त्रसंधी लागू केली. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराची शस्त्रे म्यान झाली आहेत. पाकिस्तानी लष्कराने मात्र रमजान धाब्यावर बसवून आरएस पुरा व अरनिया सीमेवरील हिंदुस्थानच्या १५ चौक्यांना आणि निवासी भागाला लक्ष्य करून गुरुवार रात्रीपासून तुफान गोळीबार केला. हा गोळीबार शुक्रवारीदेखील चालू होता. पाकिस्तानने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान सीताराम उपाध्याय (२८) हा शहीद झाला. या गोळीबारात परिसरातले चार नागरिकही ठार झाले असून, सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱयासह सहा जण जखमी झाले आहेत.

सीमेजवळ दिसले पाच अतिरेकी
अनेक दिवसांपासून सीमेपलीकडून शस्त्रसंधीच्या आडून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न अतिरेकी करत आहेत. १२ मे रोजी कठुआ सीमेवर बीएसएफच्या पथकाने पाच अतिरेकी पाहिले होते. या अतिरेक्यांना शोधण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. परंतु हे अतिरेकी हाती लागले नाहीत.

तुम्ही लाखो रुपये द्याल, पण त्याने माझा पती परत येणार आहे का?
मदतीच्या नावाखाली आता लाखो रुपये द्याल… पण त्याने माझा पती परत येणार आहे का? असा जळजळीत सवाल शहीद सीताराम यांच्या पत्नी रेशमी यांनी मोदी सरकारला केला आहे. मोदी सरकारने शस्त्रसंधी लागू करून लष्कराच्या हातातल्या बंदुका काढून घेतल्या. परंतु पाकिस्तानी लष्कराच्या बंदुका मात्र गोळय़ांची बरसात करत आहेत. त्यांनी माझ्या पतीचे प्राण घेतले, असेही ती वीरपत्नी म्हणाली. पाक लष्कराच्या गोळीबारात शहीद झालेले सीताराम उपाध्याय हे झारखंडमधील गिरिडोह येथील. २०११ मध्ये ते लष्करात भरती झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. पंधरा दिवसांपूर्वीच मुलाचा उपनयन संस्कार करून ते कर्तव्यावर परतले होते.

आपली प्रतिक्रिया द्या