Video – एक महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात, पालिकेच्या शीव रुग्णालयातून डिस्चार्ज

650

मुंबईत ३२ हजारांपैकी १७ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले असतानाच एक महिन्याच्या बाळाने देखील कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. या बाळावर पालिकेच्या लोकमान्य टिळक शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. या बाळाचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

पालिकेच्या जी नॉर्थ विभागातील एका दाटीवाटीच्या वस्तीमधील हे बाळ १९ मे रोजी सर्दी, ताप येत असल्यामुळे उपचारासाठी पालिकेच्या शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनासदृश्य लक्षणे असल्यामुळे या ठिकाणी त्याची तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनाही धक्काच बसला. मात्र शीव रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करून आवश्यक खबरदारी घेतल्यामुळे या बाळाने कोरोनावर विजय मिळवला. दरम्यान, संबंधित बाळाला कोरोनाची लागण दाटीवाटीच्या वस्तीत हायरिस्क काँटॅक्टमुळे झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून काँटॅक्ट ट्रेसिंगही करण्यात आले. बाळाच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लक्षणे नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

डॉक्टर्स, नर्स कर्मचार्‍यांकडून टाळ्या वाजवून गौरव
कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना काहीसा जास्त असल्याचे सांगितले जाते. मात्र केवळ एक महिन्याच्या बाळाने पालिकेच्या औषधोपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर विजय मिळवल्यामुळे डिस्चार्ज दिल्यानंतर शीव रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवून बाळाचा गौरव केला. यावेळी बाळाची आईही भारावून गेली.

आपली प्रतिक्रिया द्या