प्रा. दुर्गा मालती यांच्या विरोधात सोलापूरातही गुन्हा दाखल!

45

सामना प्रतिनिधी । सोलापूर

कठुआ येथील प्रकरणाचे निमित्त करून केरळ येथील डाव्या विचारसरणीच्या प्रा. दुर्गा मालती यांनी कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान शिव, त्रिशूल आणि अन्य श्रद्धास्थानांना पुरुषाच्या लिंगाच्या स्वरूपात रेखाटून अत्यंत खालची पातळी गाठली आहे. सदर प्रक्षोभक चित्रे प्रा. मालती यांनी फेसबुकवरून देशभरात प्रसारित करून समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे प्रा. मालती यांच्या विरोधात गोव्यानंतर सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या राजश्री तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एखादा बलात्काराचा आरोपी जर मुसलमान असेल, तर त्या वेळी इस्लाम किंवा त्यांची श्रद्धास्थाने यांना दोषी धरण्यात येते का? मदरशांमध्ये मौलवी अत्याचार करतात, त्या वेळी ही मंडळी कुठे असतात ? मग केवळ आरोपी हिंदु आहे म्हणून हिंदूंच्या देवतांचा अपमान करणे कितपत योग्य आहे? हे अत्यंत निषेधार्ह असून हिंदु कधीही हिंदू देवतांचा अपमान सहन करणार नाहीत, अशा संतप्त भावना या वेळी राजश्री तिवारी यांनी व्यक्त केल्या.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, प्रा. मालती यांना हिंदूंच्या धार्मिक भावना आणि श्रद्धास्थाने चांगल्या प्रकारे ज्ञात असतांनाही एक विशिष्ट अंतस्थ हेतु डोळ्यासमोर ठेवून त्यांनी देशभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत ही चित्रे जाणीवपूर्वक प्रसारित केली आहेत. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासह त्यांचा घोर अवमानही करण्यात आला आहे. ही चित्रे सामाजिक सलोखा बिघडवणारी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणारी असल्याने तातडीने प्रा. मालती यांच्या फेसबुक खात्यावर बंदी आणावी, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशा प्रकारे देवतांचे विडंबन कधीही सहन केले जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणी जर दखल घेतली नाही, तर याविरोधात आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावनी राजश्री तिवारी यांनी या वेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या