संभाजीनगरमध्ये घाटीतून कोरोनामुक्त झालेल्या पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज

347

संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजे घाटीतून गुरुवारी दुपारी कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. याबरोबर शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता 29 झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

शहरातील समता कॉलनी परिसरात राहणारा 38 वर्षांचा पुरुष घाटी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होता. हा रुग्णाला 20 एप्रिलला अत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आले होते. त्याच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्याचवेळी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल 21 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण 86 टक्के होते. त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याच्या रक्तामधील ऑक्सीजनचे प्रमाण वाढत गेले.

त्याचा 14 व्या आणि 15 व्या दिवसाचा स्वॅब अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे दोन दिवस त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी 11.30 वाजता या रुग्णाला डिस्चार्ज देत घरी पाठवण्यात आले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल इनचार्ज डॉ.मीनाक्षी भटटाचार्य, डॉ. अविनाश मुंडे, डॉ. अलीम पटेल, डॉ. संदेश मालु, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. चेतन, डॉ. दिग्विजय चव्हाण, अधिसेविका विमल केदारे, ब्रदर महेंद्र , ब्रदर प्रतिक जोशी, सिस्टर रोहीणी ठोकरे, सिस्टर हेमलता सिरसाट, सिस्टर संजीवणी बाहेकर या सर्व पथकाच्या प्रयत्नाने हा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. सध्या कोव्हीड रुग्णालयात 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. यापैकी 25 रुग्णांची स्थिती सामान्य असून 2 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. एक पॉझिटिव्ह रुग्ण बरा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता शहरातील कोरोनामुक्तांची संख्या 29 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या