जालना जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; मापेगावच्या रुग्णाचा मृत्यू

416

जालना जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मापेगाव येथील एका कोरोनाबाधित संशियताचा शनिवारी पहाटे 2 वाजता मृत्यू झाला होता. रविवारी मिळालेला त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू हा जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. तसेच एका अंगणवाडी सेविकेचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत जालन्यात 126 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

परतूर तालुक्यातील मापेगाव येथील 45 वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल रविवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला असून कोरोनाचा जालना जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे. याशिवाय जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील एका अंगणवाडी सेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मापेगाव येथील रुग्ण शुक्रवारी दुपारी न्यूमोनिया आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. चिंताजनक प्रकृतीमुळे शनिवारी पहाटे 2 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या मृत रुग्णाच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयाने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. याबाबतचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आला असून मापेगाव येथील रुग्णाच्या मृत्यूमुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि सरकारी यंत्रणेच्या प्रयत्नानंतरही कोरोनामुळे एक बळी गेल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या