पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी चारजण गेले होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाण्यात अडकले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या विजय सुरूशे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देऊळगाव माळी येथील चारजण सोमवारी सकाळी धरणाच्या सांडव्यात पोहण्यासाठी गेले होते. विजयानंद किसन कुडके ( वय 22), शुभम दिनकर गवई ( वय 22), सलमान जाकीर पठाण ( वय 22), संतोष सुखदेव माने ( वय 18) हे तरूण पोहत होते. त्यावेळी धरणातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे तरुण पाण्यामध्ये वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी वाहून गेलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सलमान पठान, शुभम गवई, विजयानंद कुडके यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संतोष एका झाडाच्या आधाराने पाण्यात अडकला होता. जिल्हा आपत्ती बचाव पथक, मेहकर येथील पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आणि गावातील विजय सुरुशे, आलम पठाण, अखील पठाण, ऋषिकेश चाळगे, मोहन मगर हे तरुण संतोषला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उत्तरले. त्यावेळी विजय सुरूशे पाण्यामध्ये अडकला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती शोध बचाव पथक, पोलीस प्रशासन आणि गावातील तरुणांच्या मदतीने संतोषला बाहेर काढण्यात यश आले. विजय सुरूशे ( वय 40) यांच्या मृत्यूने देऊळगाव माळी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आईवडील, भाऊ असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या