एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरूणाच्या अंगावर तीन वेळा कार घालून चिरडले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

एकतर्फी प्रेमप्रकणातून पेटून उठलेल्या प्रेमवीराने तरुणाला अक्षरश: कारने चिरडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यास इतरांनी एका भिंतीजवळ बसवले असता या माथेफिरूने सरळ कार भिंतीवर घातली. तीन वेळेस कार अंगावरून गेल्याने तरुणाचा चेंदामेंदा झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले. काळजाचा थरकाप उडवणारी घटना शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास कामगार चौकात घडली. या प्रकरणी जखमींना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असून मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथ्री येथील संकेत संजय कुलकर्णी (२०) हा गेल्या वर्षी संभाजीनगरात छत्रपती महाविद्यालयात शिक्षण घेत होता. संकेत कुलकर्णी हा बुधवारी संभाजीनगरात आला होता. आज दुपारी तो कामगार चौकात मित्र शुभम संजय डंख (१७ ) आणि विजय कडुबा वाघ (२०) सोबत गप्पा मारत उभा असताना कारमधील संकेत प्रल्हाद जायभाये हा त्या ठिकाणी आला. त्याने संकेत कुलकर्णी व त्याच्या साथीदारांना कारमध्ये बसण्याचे सांगितले. संकेतने नकार देताच जायभायेने त्याला कारने धडक दिली. धडक बसताच संकेत कुलकर्णी हा जखमी झाला. त्यानंतर जायभाये याने कार वळवून पुन्हा त्याला धडक दिली. गंभीर जखमी झाल्यानंतर मित्रांनी त्यास एका भिंतीच्या आडोशाला नेले असता पिसाळलेल्या जायभायेने पुन्हा कारने भिंतीला धडक दिली. यात संकेत कुलकर्णीचा चेंदामेदा झाला. आजुबाजुच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेताच जायभायेने कार सोडून पळ काढला.

मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संकेत कुलकर्णीचा मृतदेह तर शुभम डंख, विजय वाघ या दोघांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. या प्रकरणी विजय वाघ यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत कुलकर्णी याचे वडील हे पाथ्रीतील कडवट शिवसैनिक आहेत.

एकतर्फी प्रेमप्रकरण
परभणी, पाथ्री येथून संभाजीनगरात शिक्षणासाठी आलेल्या संकेत कुलकर्णी हा मित्रासह कामगार चौकात राहत होता. संभाजीनगरात शिक्षण घेत असताना त्याचा मित्र संकेत प्रल्हाद जायभाये हा एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र ही तरूणी प्रल्हाद जायभाये याच्याकडे कानाडोळा करत ती संकेत कुलकर्णीशी बोलत होती. यावरून आठ महिन्यांपूर्वी दोघांत हाणामारी झाली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाच राग मनात धरून संकेत जायभाये याने संकेतचा खात्मा केला.

संकेतला पाहताच त्याचा अंगात भूत संचारले
ज्याचावर जायभाये प्रेम करत होता ती तरुणी संकेतशी जवळीक साधत असल्याने जायभाये हा नेहमी तणावात राहत होता. संकेतचा काटा काढण्यासाठी तो पुण्यालाही गेला होता. मात्र तो त्यावेळी तो सापडला नव्हता. संकेत हा संभाजीनगरात असल्याचे कळताच जायभाये हा कामगार चौकात पोहोचला. संकेत मित्रासह गप्पा मारत उभा असताना जायभाये याच्या अंगात भूत संचारले. वाहन थांबवून ‘संकेत, मी तुला शोधत पुण्यालाही आलो होतो, मात्र तू भेटला नाहीस. आता चल’ असे म्हणून संकेत यास वाहनात बसण्याचे सांगितले. संकेत वाहनात बसला मात्र काही वेळाने तो खाली उतरला. वाहनातून उतरताच जायभाये याने त्याच्या अंगावर तीन वेळा कार घातली. यात संकेत कुलकर्णीचा चेंदामेंदा झाला.

आपली प्रतिक्रिया द्या