जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, दहशतवाद्याचा खात्मा, जवान जखमी

33
सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये हिंदुस्थानी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आलं आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबाराच्या आडून ते तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, हिंदुस्थानी सुरक्षादलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला.

या चकमकीत हिंदुस्थानी लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचा एक जवानही जखमी झाला आहे. दहशतवाद्याच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे एक एसएलआर, २ मॅगझिन्स, गोळ्यांचे ४० राऊंड्स आणि चिनी बनावटीचा एक हँड ग्रेनेड मिळाला आहे. हा दहशतवादी कुख्यात दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनशी संबंधित असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, यासंबंधी पोलिसांनी अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या