धक्कादायक! एकाच महिलेचा आठ महिन्यांत दुसऱ्यांदा विनयभंग

19

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्ली येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. सदर प्रकरणाचा तपास करत असताना सदर पीडितेसोबत आठ महिन्यांपूर्वी हॉटेलमधील त्याच खोलीत दोन अन्य कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीस्थित हॉटेल प्राइड प्लाझामधील पवन दहिया या सुरक्षा व्यवस्थापकाने २९ जुलै रोजी एका महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना पोलिसांच्या हाती अशाच प्रकारचं अजून एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. सदर फुटेज जानेवारी महिन्यातील असून पीडितेसोबत दोन अन्य कर्मचारी गैरवर्तन करताना दिसत आहेत.

हे फुटेज त्याच खोलीतील आहे, जिथे २९ जुलै रोजी विनयभंगाची घटना घडली होती. सदर फुटेजनुसार ही पीडिता महिलेसह दोन कर्मचारी दिसत असून ती त्या खोलीबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी एक कर्मचारी तिला स्वतःजवळ ओढायचा प्रयत्न करताना दिसत आहे. महिलेने विरोध केल्यानंतर तिला मारहाणही करण्यात आली आहे. तसंच, या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरा झाकण्याचा प्रयत्नही यातील एका कर्मचाऱ्याने केलेला दिसत आहे.

हे फुटेज जाहीर होताच हॉटेल प्रशासनाने या दोन्हीही कर्मचाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ केल्याचं हॉटेलचे प्रवक्ते राजा सिंह यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आल्यामुळे हॉटेलच्या प्रशासन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या