नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली

24

सामना प्रतिनिधी, नाशिक

पाऊस व इतर अनेक कारणांनी अन्य राज्यांमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत नाशिकच्या उन्हाळ कांद्याची मागणी वाढली आहे. परिणामी, या हंगामात प्रथमच आज नामपूर बाजार समितीत कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हंगामाच्या सुरुवातीपासून मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्च सुटण्याइतपत तरी भाव मिळेल, अशी आशा वाढली आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच उन्हाळ कांद्याचे भाव अक्षरशः गडगडले होते. कांदा बाजारात दाखल झाल्यापासून मातीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱयांवर आली. एप्रिलमध्ये कमाल भाव ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलच्या घरात होता. मागील महिन्यातही सरासरी भाव ३५० ते ४०० रुपये असा होता. यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आठ दिवसांपासून भावात हळूहळू सुधारणा होताना दिसतेय. दक्षिणेकडील राज्यांमधील कांदा लागवडीखालील क्षेत्र घटले आहे.

गुजरात व इतर राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याने टंचाई निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश सरकारने कांदा खरेदी करून लगेचच त्याची विक्री केल्याने तेथील स्थानिक बाजारातही तुटवडा जाणवतोय. या सर्व कारणांमुळे नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली आहे. जूनच्या तुलनेत सरासरी भावात क्विंटलमागे सहाशे रुपयांची, कमाल भावात हजार रुपयांची वाढ झाली आहे. नामपूर बाजार समितीत कांद्याला या हंगामातील उच्चांकी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यापाठोपाठ पिंपळगावला १५०१, सटाण्यात १४६७, लासलगाव, उमराणेत प्रत्येकी १४५१ रुपये प्रतिक्विंटल कमाल भाव मिळाला. किमान भावही २०० ते १०००, सरासरी भाव ९५० ते १३७० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.

जिल्ह्यात बाजार समितीनिहाय किमान, कमाल, सरासरी भाव प्रतिक्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे : उमराणे- ९९९-१४५१-१३७०, सटाणा- ५००-१४६७-१२००, वणी- ११००-१४००-१२५०, निफाड- ५००-१४०१-१२००, सिन्नर- २००-१३५१-११००, नामपूर- ८००-१६००-१२५०, लासलगाव- ५००-१४५१-१२५०, पिंपळगाव- ७००-१५०१-११५०.

आपली प्रतिक्रिया द्या