कोपरगाव : कांदा व्यापाऱ्यांना आर्थिक फटका, कांदा लिलाव चार दिवस बंद

सामना प्रतिनिधी, कोपरगाव

शनिवारी ब्राह्मणगाव टाकळी येसगाव या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे टाकळी फाट्या येथील कांदा शेडमधील वजन मापे झालेला कांदा भिजला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने कोपरगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून व्यापाऱ्यांनी कांदा विक्री बंद ठेवली. त्यामुळे मंगळवार ते शनिवार असे चार दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली आहे.

कोपरगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी टाकळी परिसरात नव्याने मोठमोठाले कांद्याचे शेड उभे केले होते. त्यात खरेदी केलेला कांदा साठवून वजन मापे करून ठेवला होता. मात्र शनिवारी रात्री झालेल्या दमदार पावसाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात कांदा भिजला व वाहून गेला. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद ठेवली आहे. त्यामुळे कोपरगाव बाजार समितीने मंगळवार दिनांक 25 रोजी ते शनिवार दिनांक 29 पर्यंत चार दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बद्दलची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले संचालक मंडळ व प्रशासनाने घेतला असल्याची प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणू नये असे विनंती करण्यात आली आहे. पावसाचे वातावरण व कांदा साठवण या अडचणीमुळे बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून सामान्य जनतेला देखील कांद्याचा वांध्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.