लासलगावमध्ये बारा दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत

22

सामना ऑनलाईन, नाशिक / लासलगाव

कांदा लिलावानंतर शेतकऱ्यांना पाच हजारांपर्यंत रोख व उर्वरित रकमेचा राष्ट्रीयीकृत बँकेचा धनादेश देण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविली. त्यामुळे तब्बल बारा दिवसांनंतर आज लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. १८ एप्रिलच्या तुलनेत भावात क्विंटलमागे ५० ते ९० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापारी शेतकऱ्यांना धनादेश देत होते, मात्र ते वटण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कायम होत्या, त्यांना दिलासा मिळावा म्हणून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोखीने किंवा एनईएफटीद्वारे पैसे देण्याच्या सूचना लासलगाव बाजार समितीने केल्या होत्या, मात्र व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत १९ एप्रिलपासूनच लिलाव बंद पाडले.

८५० वाहनांमधून २० हजार क्विंटल कांदा लिलावासाठी
तब्बल बारा दिवसांनंतर आज बाजार समिती आवार शेतकऱ्यांच्या गर्दीने पुन्हा गजबजले. शेतकऱ्यांनी ८५० वाहनांमधून सुमारे २० हजार क्विंटल कांदा लिलावासाठी आणला. आज किमान ३००, कमाल ६०० व सरासरी ४७० रुपये क्विंटल भाव मिळाला. सर्वच शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांचे धनादेश दिले, दोन दिवसात ते वटतील, वेळेत वटले नाहीच तर एनईएफटीद्वारे रक्कम देण्यास व्यापाऱ्यांनी होकार दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या