एक हजारचा शर्ट पडला 1 लाख 80 हजाराला, सायबर भामट्याने केली फसवणूक

869

ऑनलाइन पोर्टलवर खरेदी केलेला एक हजाराचा शर्ट परत करण्याच्या नावाखाली भामटय़ाने तरुणाला चुना लावल्याची घटना समोर आली आहे. फसवणूकप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे मालाड येथील रहिवासी आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी तीन शर्ट ऑनलाइन मागवले होते. त्याकरिता अकराशे रुपये मोजले होते. ऑनलाइन मागवलेले शर्ट न झाल्याने ते तक्रारदारांना परत करायचे होते. त्याकरिता त्यांनी इंटरनेटवर ऑनलाइन नंबर सर्च केला. एका ऑनलाइन पोर्टलवरील कस्टमर केअरचा नंबर त्यांना दिसला. त्या नंबरवर त्यांनी फोन केला असता सायबर भामटय़ाने आपण कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले.

ऑनलाइन मागवलेले शर्ट परत घेऊ अशा भूलथापा मारल्या. पैसे परत करण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडून त्याच्या बँक खात्याचे तपशील मिळवले व त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 79 हजार रुपये भामटय़ाने काढले. खात्यातून पैसे गेल्याचा तक्रारदारांना मेसेज आला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने त्या नंबरवर फोन केला असता तो नंबर बंद होता. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भामटय़ाने सर्च इंजिनमध्ये फेरफार करून खऱया नंबरऐवजी स्वतःचे नंबर टाकल्याचे प्रकार समोर येत आहेत. वाइन शॉप्स, हॉटेल्सच्या नावाखाली भामटे हे फसवणूक करतात. त्यामुळे सर्च केलेला नंबरवर फोन करण्यापूर्वी खात्री करावी असे सायबर तज्ञांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या