ऑनलाईन शॉपिंग ठरतंय मानसिक आजाराचं कारण

47

सामना ऑनलाईन । मुंबई

ऑनलाईन शॉपिंगमुळे खरेदी करताना कराव्या लागणाऱ्या पायपिटीला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. पण, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शॉपिंग करायच्या हव्यासामुळे ऑनलाईन शॉपिंग हा एक मानसिक आजार बनत चालला आहे. सतत शॉपिंग साईट पाहणं, डाऊनलोड करणं यांमुळे अनेकजण कंपलसिव्ह शॉपिंग डिसऑर्डर नावाच्या आजाराला निमंत्रण देत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्यात सरासरी तीन ते चार केसेस या शॉपिंग डिसऑर्डरच्या येतात. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचा समावेश जास्त आहे.

ऑनलाईन शॉपिंग हा सुरुवातीला काहीसा आकर्षक किंबहुना फायदेशीर वाटणारा प्रकार आहे. पण, हळूहळू ही सवय व्यसनाचं रूप धारण करते. या व्यसनासाठी अनेक जण चोऱ्या करतात किंवा कर्जबाजारी होतात. घरात आणलेल्या वस्तू या बऱ्याचदा अनावश्यक असतात. त्यामुळे अशा लोकांची घरातल्यांसोबत भांडणंही होतात. पण, तरीही त्यांची खरेदी करायची सवय सुटत नाही, असं निरीक्षण अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विशेष म्हणजे, कित्येक लोकांना आपल्याला असा काही आजार असल्याच्या पत्ताच नसतो. त्यामुळे समस्येवर उपाय शोधताना त्यांना अडचणी येतात. वेळीच उपचार झाले नाहीत तर अशी व्यक्ती नैराश्याच्या आहारी जाऊ शकते.

कंपलसिव्ह शॉपिंग डिसऑर्डरची लक्षणं-
सतत शॉपिंगचा विचार करणं. त्याखेरीज अन्य कोणताही विचार न करणं.
इंटरनेट किंवा मोबाईल जवळपास नसेल तर अस्वस्थ होणं.
शॉपिंगच्या मुद्द्यावरून भांडण करणं.
शॉपिंग न केल्यास मूड बिघडणं.
खरेदी केलेली वस्तू लपवून ठेवणं.
खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप होऊन स्वतःला दोष देणं.

हे आहेत उपाय-
आपली गरज आणि चैन यांच्यातला फरक ओळखा. गरज असेल तरच खरेदी करा.
काही वस्तू स्वस्त मिळाल्या, म्हणून महिन्याचं बजेट त्यात वापरू नका. शॉपिंगव्यतिरिक्त शिक्षण, आरोग्य, पाणी-वीज, अन्न इत्यादी अन्य महत्त्वाच्या खर्चांचा आधी विचार करा.
खूप जास्त आणि सततच्या शॉपिंग करण्याने तुमच्या खिशावर ताण पडतोच, शिवाय तुमच्या भविष्याच्या तरतुदीसाठीची रक्कमही खर्च होते. त्यामुळे फक्त गरजेपुरतं आणि एखाद्या सणवारीच शॉपिंग करा.
बऱ्याच शॉपिंग वेबसाईट्स ऑफर फक्त तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीच देत असतात. तसंच विकल्या न गेलेल्या वस्तूही या शॉपिंगच्या माध्यमातून तुमच्या गळ्यात पडू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या