सात महिन्यांत केवळ ५४ कोटींची करवसुली

22

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

 संभाजीनगर मनपाची आर्थिक परिस्थिती संकटात असल्याने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाने शेकडो कर्मचारी-अधिकाऱ्यांचा ताफा कामाला लावला आहे. परंतु गेल्या सात महिन्यांत केवळ ५४ कोटी ११ लाख ३८ हजार रुपयेच तिजोरीत जमा झाले आहेत. त्याची आकडेवारी केवळ १२ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली १३ कोटी ५० लाखांनी जास्त आहे.

महानगरपालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट आहे. त्यामुळे शहरातील विकास कामांवर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे कंत्राटदारांची देणी वाढत आहेत. सध्या मनपाला १७० कोटी रुपयांचे देणे आहे. त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी आयुक्तांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. निवासी व व्यावसायिक मालमत्तांकडील थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी वॉर्ड कार्यालयांवर आहे. मोठ्या थकबाकीदारांसाठी अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. मोबाईल टॉवर, शैक्षणिक संस्थांकडे असलेल्या वसुलीसाठी स्वतंत्र अधिकारी आहे. वसुलीसाठी खासगी एजन्सीचे शेकडो कर्मचारी कामाला लावल्यानंतरही म्हणावी तशी वसुली होत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ५५२ कोटी रुपयांची मालमत्ता करापोटी मागणी होती, तर ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यात (२६ ऑक्टोबरपर्यंत) ५४ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये जमा झाले आहेत. ही आकडेवारी गतवर्षीपेक्षा १३ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त आहे.

दिवाळीनंतर मनपा पदाधिकारी रस्त्यावर
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी दिवाळीनंतर १२ ते २० तारखेदरम्यान वसुलीची जम्बो मोहीम हाती घेतली जाणार आहे. मात्र, यावेळी या मोहिमेत महापौरांसह मनपा पदाधिकारी, नगरसेवकही रस्त्यांवर उतरणार आहेत. १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या