भाजपचे राज्य नाही तिथेच ED आणि राज्यपाल; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

पश्चिम बंगालमधील मधील तणावाचे वातावरण, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असे चित्र आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवाया यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि तपास यंत्रणांना सणसणीत टोला लगावला. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ED कडून कारवाया होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात आणि बंगालमध्येच राज्यपाल आणि सरकार यांच्यात वादाचे चित्र दिसते. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘ईडी आणि राज्यपाल दोन्ही सरकारांवर निशाणा साधत असतात. इतरही राज्यांत राज्यपाल आहे. इतर राज्यांतही ईडीची कार्यालय होऊ शकतात मात्र ईडी आणि राज्यपाल जिथे भाजपचे राज्य नाही तिथे आम्हालाच लक्ष्य बनवत असतात, याचा अर्थ समजून घ्या.’, असेही ते म्हणाले.

रशिया-युक्रेन, हिजाब, कश्मीर फाईल्स पेक्षा महागाई-बेरोजगारी या मुख्य समस्या

महागाईच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट मुळ मुद्द्याला हात घातला. ‘महागाईच्या मुद्दावरून संसदेच्या दोन्ही सदनात गोंधळ झाला आणि कामकाज बंद पडलं. निवडणुका झाल्या आणि महागाई वाढली. हीच भाजपची निती आहे, चाल आहे. ज्यात लोकं अडकतात. देशापुढील मुख्य समस्या ‘रशिया-युक्रेन युद्ध, हिजाब बंदी, कश्मीर फाईल्स’ नाहीत. तर खरी समस्या ही महागाई आणि बेरोजगारी आहे’, असे सांगत त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

आमदारांना जेवायला बोलावलं असेल, तर चांगली गोष्ट…

पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी तो प्रश्न फेटाळून लावताना मुख्यमंत्र्यांची बाजू समजावून सांगितली. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यापासून वर्षा बंगल्यावंर अनेकदा आमदारांना जेवायला बोलावलं आहे. अधिवेशनापूर्वी विरोधकांना चहापानाला बोलावलं जातं, मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांचे चहापान गोड लागत नाही. त्यानंतर मविआच्या आमदारांना बोलावलं जातं, त्यानुसार त्यांनी आमदारांना जेवायला बोलावलं असेल, चांगली गोष्ट आहे ही.

केंद्रीय यंत्रणांप्रमाणे सूडाच्या कारवाया महाराष्ट्राच्या यंत्रणा करणार नाहीत!

केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने सूडाच्या भावनेने तपास करतायत, कारवाया करतायत त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आणि राज्याचं गृहमंत्रालय कधीच करणार नाही. विरोधी पक्ष म्हणतायत आम्ही सूडाच्या कारवाया सुरू आहेत. आम्हाला सूडाच्या कारवाया करायच्या असतील तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल आम्हाला त्याची गरज नाहीये, असे त्यांनी स्पष्ट केले. ईडीच्या कारवाया पाहता उद्या शिवसेनेच्या वडा पावच्या गाड्यांवरही ईडी कारवाई होईल असे वाटते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.