जळगावात महापौर शिवसेनेचाच- संजय राऊत

24

सामना ऑनलाईन । जळगाव

शिवसेनेच्या वाटचालीत उत्तर महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच आगामी जळगाव महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून येथे महापौर शिवसेनेचाच होईल असा ठाम विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. सुरेशदादा जैन हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच पुढची वाटचाल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर संजय राऊत यांनी आज जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मेळावे झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भाजप सरकारच्या कारभारावर कडक शब्दांत टीका केली.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच हे मेळावे होते असे सांगून ते म्हणाले की, शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत उत्तर महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच आगामी जळगाव मनपाची निवडणूक शिवसेना ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर अर्थात स्वबळावर लढणार आहे. एवढेच नाही तर महापौर शिवसेनेचाच होणार असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रात सुरेशदादा जैन यांच्याशिवाय आम्ही विचारही करू शकत नाही. त्यामुळे आगामी काळातील काही निर्णय हे सुरेशदादांना विश्वासात घेऊनच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत, उपसंपर्कप्रमुख के. पी. नाईक, आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर. ओ. पाटील, चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे आदींची उपस्थिती होती.

एकनाथ खडसे भाजपात राहणार नाहीत!
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये अस्थिर आहेत. आपली तगमग त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली आहे. कधी ते अजित पवारांच्या कानात काहीतरी कुजबुजतात. अजित पवार त्यावर टाळी वाजवतात. या टाळ्या त्यांनाच लखलाभ असोत. पण खडसे यांची एकूण अवस्था पाहता ते जास्त दिवस भाजपमध्ये राहतील असे वाटत नाही आणि पक्ष सोडलाच तर कोणत्या पक्षात जातील हे सांगता येणार नाही असे संजय राऊत म्हणाले. आम्ही युतीचे जन्मदाते आहोत पण एकनाथ खडसे यांनी युती तोडली. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे खडसे आज त्यांच्याच पक्षात निर्वासित झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

भीमा-कोरेगावची ठिणगी एल्गार परिषदेत
भीमा-कोरेगावची दंगल सहजासहजी घडलेली नाही. या दंगलीची ठिणगी पुण्यात शनिवारवाडय़ासमोर झालेल्या एल्गार परिषदेत पडली असे सांगून संजय राऊत म्हणाले की, जेएनयूमध्ये अफझल गुरूचे श्राद्ध घालणाऱ्या उमर खालीदला या परिषदेला बोलावण्यात आले. हिंदुस्थानचे तुकडे पाडण्याची भाषा करणाऱया खालीदला कोणी बोलावले याचीही चौकशी झाली पाहिजे. शिवसेनेच्या मागणीनंतर आता या घटनेची न्यायालयीन चौकशी होत असल्याचेही ते म्हणाले.

गुजरातेत दमछाक झाली
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी सगळी प्रतिष्ठा पणाला लावली. अनेक सभा घेतल्या पण धापा टाकत भाजपला विजय मिळवावा लागला असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. ज्या गुजरातने देशाला पंतप्रधान दिला त्या राज्यात भाजपची अशी केविलवाणी अवस्था झाली, असेही ते म्हणाले.

आगामी सरकार शिवसेनेचेच!
आगामी काळात सरकार बदलणार आहे, काय कामे करायची असतील ती करून घ्या असे सांगून गिरीश बापट यांनी भाजपची भूमिकाच स्पष्ट केली आहे. राज्यात पुढचे सरकार शिवसेनेचेच असेल असा आत्मविश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला.

कर्जमाफीवरून शेतकरी नाराज
कर्जमाफी झाली नाही तर भूकंप होईल असा इशारा मी दिला होता. त्यानंतर २४ तासांत मोठा गाजावाजा करून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. परंतु या कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला? ऑनलाइन, ऑफलाइनच्या घोळात शेतकरी भरडला गेला. नाराजीच्या या वणव्याचे चटके सरकारला बसल्याशिवाय राहणार नाहीत असे खडे बोलही संजय राऊत यांनी सुनावले. सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची हिंमत फक्त शिवसेनेतच आहे, असेही त्यांनी ठणकावले. शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करतच राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या