भाजपच्या डबल इंजिन सरकारला आमचा पक्षच सत्तेबाहेर काढू शकतो; ममता बॅनर्जी कडाडल्या

भारतीय जनता पक्षाच्या डबल इंजिन सरकारला सत्तेबाहेर काढण्याची क्षमता केवळ तृणमूल काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पश्चिम बंगालमधला सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसही त्रिपुरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. टीएमसीच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्रिपुरात दाखल झाल्या आहेत. बॅनर्जी यांनी मंगळवारी एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना भाजपवर जोरदार टीका केली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेस हा देशातला एकमेव पक्ष आहे जो भाजपच्या डबल इंजिन सरकारला सत्तेतून बाहेर काढू शकतो. देशातल्या नागरिकांना भाजपाऐवजी उत्तम पर्याय देऊ शकतो. त्रिपुरातल्या जनसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, भाजपच्या काळात त्रिपुरामध्ये लोकशाहीची पायमल्ली झाली आहे. राज्यात पक्षांच्या राजकीय बैठकांना परवानगी नाकारली जात आहे. पत्रकारांनी बातम्या गोळा करण्याचा अधिकार गमावला आहे, असा आरोप त्यांनी केला.

ममता यांनी सवाल केला आहे की, डबल इंजिनवाले सरकार असताना देशात बेरोजगारी 40 टक्क्यांनी वाढली आहे. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली का, तुमच्या बँक खात्यात 15 लाख रुपये आले का,असा सवालही त्यांनी केला. ममता म्हणाल्या की, जो पक्ष जनतेला 100 दिवस काम (रोजगार) देऊ शकत नाही त्या पक्षाला लोकांची मते मागण्याचा अधिकार नाही. ममता म्हणाल्या की, 2 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला केला गेला. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही कार्यकर्त्यांना बेकायदा तुरुंगात डांबण्यात आले. येथे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे.