नरेंद्र मोदी यांना विजयसभेचे निमंत्रण!!

<संजय राऊत>

‘‘पंतप्रधान मोदी यांना माझे अत्यंत विनम्रपणे निमंत्रण आहे. मोदीजी, 23 तारखेला शिवसेनेच्या विजयी जल्लोषात सामील व्हा. विजयसभेत सामील व्हा!!’’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे जबरदस्त आवाहन मुलाखतीच्या तिसऱया भागात केले. उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक असे घणाघात केले. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर केंद्रात आणि राज्यात परिवर्तन होईल, असे संकेत त्यांनी दिले. सध्या जे चाललंय ते भाजपातील तरी कितीजणांना पटतंय, असा मार्मिक सवाल त्यांनी केला. मुंबईत होणारे समुद्रातील शिवस्मारक इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक नक्की कधी होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या मुलाखतीने सर्व विरोधक खरोखरच ‘कोमा’त गेले. मुलाखतीची चर्चा देशभर सुरू आहे.तिसऱ्या भागातील चर्चा पुन्हा खणखणीत सुरू झाली!

आजही सर्वत्रयुतीतुटल्याचीच खमंग चर्चा सुरू आहे

– त्यात खमंग काय आहे? कुजका-सडका भाग काढून फेकून दिलाय. अतिरेकच झाला होता. आम्ही सर्व मनापासून सांभाळायचा प्रयत्न केला होता.

महाराष्ट्रात एक वेगळं राजकीय वातावरण तयार झालंय

– होय. नक्कीच झालंय तसं. मोकळं झाल्यासारखं वाटतंय सगळय़ांना. दुसरं काय सांगणार?

महाराष्ट्राची जनता शिवसेनेवर खूश आहे तुमच्या निर्णयामुळे

– त्या सगळय़ांना मी खरंच धन्यवाद देतोय.

पण ही युती खरं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीच तुटली होती

– होय. तेव्हा त्यांनी चर्चेचं गुऱहाळ घालून हा डाव साधला होता, पण शिवसेनासुद्धा लेचीपेची नाही हे त्यांना दाखवून दिलं. देशात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. मोदींचं वारं होतं. सत्ता हाताशी होती. तेव्हा नोटाबंदीही नव्हती. शिवसेनेला 10-15 जागा मिळाल्या तरी बस, अशी त्यांच्या दिल्लीच्या वर्तुळात चर्चा होती. आम्ही 63 जागा जिंकल्या. 20 जागा थोडक्यात गेल्या.

तेव्हाही असेच युद्ध झाले, पण शेवटी तुम्ही सत्तेत सहभागी झालात. हे का केलेत?

– सांगतो तुम्हाला. विधानसभेच्या वेळेला युती तुटेल अशी अपेक्षा लोकांची नव्हती. पंचवीस वर्षे आम्ही काँग्रेस नको म्हणून एकत्र लढलो. हिंदुत्वासाठी म्हणून एकत्र राहिलो. अनेक हिंदू मनेही त्यावेळी दुखावली गेली. मराठी मनेही त्यावेळी दुखावली गेली. मग मी विचार असा केला की, युती तुटली… त्यांनी तोडली हे जरी खरे असले तरी काँग्रेस आपल्या राज्यातून जातेय हेसुद्धा सत्य होतं. मग केवळ आणि केवळ काँग्रेस नको या लोकांच्या भावनेचा आदर ठेवून मी पुन्हा युती करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यानंतरसुद्धा त्यांना कुठेच युती नकोशी असेल तर मग मात्र भावनेतून बाहेर पडून काही पावलं उचलावीच लागली. युती तुटावी अशी खरं तर कोणाचीच भावना नव्हती, पण आता नाइलाजच झाला. आता गेल्या दोन-अडीच वर्षांत आम्ही भावनाविरहित काळ पूर्ण पाहिला आहे. आज देशातले चित्र काय आहे? प्रत्येक राज्यात जिथे जिथे समर्थ पर्याय जनतेला मिळाला. प्रादेशिक पक्षाच्या रूपात मिळाला. जनतेने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना नाकारून तो पर्याय स्वीकारला. मग तो दिल्लीत असेल, बिहारमध्ये असेल, बंगालमध्ये असेल. तामीळनाडूत असेल, केरळात असेल. बहुतेक ठिकाणी जनतेने काँग्रेस नको आणि भाजपही नको अशी भूमिका स्वीकारून तिथल्या प्रादेशिक पक्षाला आपले आशीर्वाद दिले आहेत. इतर प्रदेश जर हे करू शकले तर महाराष्ट्र का नाही करणार?

शिवसेना या सगळ्या प्रादेशिक पक्षांचा बाप आहे

– नक्कीच.

या सगळय़ांच्या आधीच शिवसेनाप्रमुखांनी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून प्रादेशिक पक्ष स्थापन केला, पण आपणच सगळय़ात मागे राहिलो. तुमच्या भाषेत पंचवीस वर्षे सडली

– हो. सडलीच.

सडली या शब्दावर अजूनही तुम्ही ठाम आहात का?

– मी ठाम आहेच ना. बोललो म्हणजे बोललो. सडली म्हणजे सडलीच. एखादी गोष्ट बोलल्यानंतर शब्द बदलणे ते चांगलं नाही होऊ शकत.

युतीत एवढी वर्षे सडली, असं आपण का म्हणता?

– नाही म्हटलं तरी एक फसगत झाल्याची भावना आहे. तुम्ही म्हणालात ते खरं आहे की, कदाचित आपल्या देशातल्या अगदी सुरुवातीच्या स्थापन झालेल्या प्रादेशिक पक्षांमधली शिवसेना आहे. तृणमूल असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, मायावतींचा बसपा किंवा समाजवादी पक्ष असेल. नवीन पटनायकांचा पक्ष असे हे त्यामानाने अलीकडचे पक्ष आहेत. नवीन पटनायकांनीसुद्धा फार पूर्वीच युती तोडून टाकली आणि ते युती तोडल्यानंतर सलग दुसऱयांदा सत्तेवर आले आहेत. लोकांना प्रादेशिक अस्मिता आणि स्वतःला न्याय देणारा पक्ष आवडतो.

शिवसेनाप्रमुखांची लोकप्रियता प्रचंड असूनही या शर्यतीत शिवसेना मागे राहिली

– शिवसेना याबाबतीत मागे एवढय़ाचसाठी राहिली की थोडा भाबडेपणा असेल किंवा आमच्यावर झालेले संस्कार असतील. हिंदुत्व…राष्ट्रीयत्व! आणि तुम्ही जर का हे काम अधिक चांगल्या पद्धतीने राज्याच्या बाहेर करत असाल तर तिकडे आमच्याकडून कुठेही अडथळा नको. आपण दोघं मिळून जर इकडे आनंदात त्याच विषयावर चांगले काम करत असू. आपापसात कुठे भेदभाव नको म्हणून आम्ही पंचवीस वर्षे हे सगळं सहन केलं. पंचवीस वर्षे. मी मघाशी पण जे सांगितलं की, या काळात खरंच युतीचा आम्हाला किती लाभ झाला, किती वर्षे आम्ही सत्तेत होतो. मग युतीचा नेमका उपयोग तरी काय झाला? नुसतं भाजपला वाढीसाठी युतीचा उपयोग त्यांनी करून घेतला. आम्हाला काही लाभ झालाय असं वाटत नाहीय. आता त्यांची लाट आहे असं काही वाटत नाही. जशी जनता पक्षाची लाट आली आणि गेली.

ही लाट नक्की कोणाची होती?

– सार्वत्रिक लाट होती, काँग्रेस नको.

युती तुटल्यामुळेच आपण मुख्यमंत्री झालो असं फडणवीस सांगताहेत

– झालात, पण टिकलात कोणामुळे? पुन्हा युती करावीच लागली ना. पण आतासुद्धा तुम्ही गोव्यात होतात. तेथेही पोस्टरबॉय मोदीच होते ना. लोकसभेपासून महापालिकेपर्यंत भाजपकडे मोदींशिवाय चेहरा कुठेय? प्रत्येक निवडणुकीत ते मोदींचा चेहरा घेऊनच फिरताहेत. त्यांचा पक्ष बांधला गेलेलाच नाहीय. हवेवर तरंगतोय.

10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या मिनी विधानसभेचेच स्वरूप या निवडणुकीत आहे. एक रंगीत तालीम आहे. आपण स्वतः मुंबईत अडकलेले आहात

– अडकलेलो नाही. मी पुण्यात जाणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये जाणार आहे. नाशिकलाही जाईन. साहजिकच आहे, काही ठिकाणी मी जाऊ शकणार नाही. पण तिथे शिवसेनेचे नेते जातील आणि मला असं वाटतं की आता प्रसारमाध्यमातून जसं आता मी ‘सामना’शी बोलतोय. माझी भूमिका सर्वदूर जाणार आहे. प्रसारमाध्यमे जी आहेत ती कानाकोपऱयात जातात. आपली भूमिका तिकडे जाणे गरजेचे असते. आणखी एक मुद्दा आहे, मोदी बिहारमध्ये एवढे फिरले. कुठे निवडून आले! बंगालमध्ये गेले, तामीळनाडूत गेले, कुठे निवडून आले?

भाजपबरोबर तुमचा रोज संघर्ष सुरू आहे

– आम्हाला काय त्याची हौस नाही. आम्ही ढोंगाविरुद्ध लढतोय. चुकलेल्या धोरणांवर आणि थापेबाजीवर बोलतोय. लोकांना व देशाला फसवले आहे त्यावर रान उठवतोय. व्यक्तिगत कुणाचे काहीच नाही.

तरीही तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत आहातहे चुकीचे नाही का वाटत?

– आम्ही एक प्रयत्न करून पाहिला. सत्तेवर अंकुश ठेवला नाही तर ते बेलगाम होतात. सत्तेत राहून आम्ही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. देशविरोधी, जनताविरोधी अनेक धोरणांना शिवसेनेने सरकारात राहून विरोध केला. आज ती धोरणं अडकली आहेत. भूसंपादनाचा काळा कायदा असेल, आता जे ‘जीएसटी’ बिल येतंय तेसुद्धा आम्ही आमच्या सूचनांसह स्वीकारायला लावलंय.

पण सत्ता भाजपच्या हातात असल्यामुळे शिवसेनेची कोंडी होतेय. अनेक बाबतीत सत्तेचा वापर करून ही कोंडी केली जातेय असं आपल्याला वाटत नाही काय?

– शिवसेनेची कोंडी करणारा अजून जन्माला आलेला नाही आणि आम्ही सत्तेचे लालची नाही. मघाशी मी म्हटलं ना, आम्ही सत्ताधाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी तळमळीने बोलतो आणि लिहितो. त्याचा अर्थ ते जर ‘विरोधक’ म्हणून घेत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, आमचा नाही.

राजकारणात तुम्हाला कोणाचं आव्हान वाटतंय?

– शिवसेनेला ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत आव्हानं दिली. मी सगळय़ांना सांगतो, खोटं असेल तर खोटं ठरवा… ते आज राजकारणात मला ताकदीने दिसत नाहीत. बरेच जण तर कायमचे संपले. याचा अर्थ असा की, शिवसेना हा एक विचार आहे. नुसती सत्तालोलुपता नाहीए. मला काहीतरी व्हायचंय म्हणून मी लढतोय. मला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून मी लढतोय, मला महापौर व्हायचंय म्हणून लढतोय, मला सरपंच पण व्हायचंय, मला पंतप्रधान पण व्हायचंय ही सत्तालोलुपता आहे ना, तशी सत्तालोलुपता शिवसेनेत नाही.

तुमच्या समोर भाजपचं आव्हान आहे, तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंही आव्हान दिसतंय.

– कसलं आव्हान? कोणाचं आव्हान? नुसती त्यांची बोंबाबोंब सुरू आहे. घसे बसलेत त्यांचे. सत्तेची गरमी असली की आव्हानाची भाषा सुचते. अजिबात आव्हान नाही. असले शब्द वापरू नका. शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या धगधगत्या मुशीतून तयार झालेला आहे. शिवसेनेची पन्नास वर्षांची वाटचाल पाहा आणि इतर पक्षांची वाटचाल पाहा. जिवापाड प्रेम करणारे लोक फक्त शिवसेनेतच आहेत. निवडणूक आल्या की पावसाळय़ाप्रमाणे छत्र्या उघडणारी आणि ‘डराव डराव’ करणारी संघटना नाही ही. लोकांच्या सेवेसाठी सदैव सज्ज असलेली ही सेना आहे.

मुंबईत सभा घ्या, असे आव्हान तुम्ही पंतप्रधानांना दिलंय

– पुन्हा तुमचे तेच. आव्हान नाही. मी खरं तेच बोललोय. यावंच त्यांनी! सत्यच आहे ते!

काय आहे नेमके सत्य?

– परखड सत्य. देशाच्या पंतप्रधानांना मी आव्हान कसे देऊ. ते खूपच मोठे आहेत. तुम्हाला आठवतंय का? विधानसभा निवडणुकीसाठी एकटय़ा महाराष्ट्रात देशाच्या पंतप्रधानांनी 27 सभा घेतल्या. घ्याव्याच लागल्या त्यांना आपला महाराष्ट्र जिंकायला. 27 सभा घेतल्यानंतर त्यांचे 121 आले. जे आले त्यात शुद्ध भाजपचे किती? देताय उत्तर? इतर पक्षांतले लोक फोडून 121 आले. आता मी सत्य हेच सांगितलंय की, त्यांनी सभा घेतल्या तरी मुंबईत शिवसेनेचाच विजय होणार आहे.

हे आव्हानच आहे

– हे आव्हान नाही. हे सत्य मी नम्रपणाने नमूद करू इच्छितो. अत्यंत विनम्र भाव से… शंका नकोय!

तुम्ही त्यांना विजयी सभेसाठी बोलावताय का?

– जर त्यांनी मुंबईत त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेतलीच तर माझे शिवसैनिक त्यांना तेथे जाऊन प्रेमाने निमंत्रण देतील. जसे तुम्ही आज त्यांच्या प्रचाराला आलात, तसं तुम्ही 23 तारखेला शिवसेनेच्या विजय सभेला या. जल्लोषात सामील व्हा.

हेच तर आव्हान देताय तुम्ही

– हे आव्हान वगैरे अजिबात नाही. कधीकाळी आपले संबंध होतेच ना चांगले. त्या जुन्या प्रेमाला आणि नात्याला जागून मी त्यांना आमच्या विजयोत्सवाचे आमंत्रण देत आहे.

केंद्र आणि राज्य सरकार वचने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या असं वाटतं का आपल्याला?

– त्यांनी काय काय वचनं दिली होती तीच आता आठवत नाहीत.

सरकारमध्ये आपणही आहात

– हो, पण त्यांनी काय काय सांगितलं होतं तेच आता आठवत नाही. लोकांना आता एटीएममध्ये स्वतःचेच हक्काचे पैसे कधी आले, किती मिळतील तेवढाच विषय राहिला आहे. तो एक राष्ट्रीय प्रश्न झालेला आहे. राष्ट्रीय समस्या आणि ती लादलेली.

नोटाबंदीवर सगळय़ात मोठा हल्ला या देशात तुम्ही केला. सरकारचा निर्णय होता आणि नोटाबंदीविरुद्ध बोलणारे देशद्रोही अशाप्रकारचा एक माहोल निर्माण केला गेला. तुमची भूमिका त्यावेळी काय होती?

– माझी भूमिका मी स्पष्ट मांडली होती. मी काय अर्थतज्ञ नाही. आजही मी तेच सांगतो. नोटाबंदीचे फायदे-तोटे हे आता हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले आहेत. माझं त्यावेळी बोलणं हेच होतं की, तुम्हाला जे करायचंय तेच नेमकं करा. त्यासाठी सर्वसामान्य जनतेला छळू नका, पिडू नका. मला आठवतंय, 8 तारखेला नोटाबंदी झाल्यानंतर 11 तारखेला मी पत्रकार परिषद घेतली. म्हणजे जेमतेम दोन-चार दिवसांतच मी बोललो होतो आणि त्यानंतर जवळपास शंभर ते सव्वाशे बळी गेले आहेत सर्वसामान्य लोकांचे. मला वाटतं एका निवृत्त जवानानेसुद्धा गोळी घालून घेतली आहे. आत्महत्या केली. आता हे पाप कुणी केलं? कशासाठी तुम्ही केलंत? दहशतवादी हल्ले थांबले की नाही थांबले हा भाग अलाहिदा. पण दहशतवादी हल्ल्यात किती बळी गेले हा जसा विषय असतो तसा तुमच्या नोटाबंदीच्या हल्ल्यात किती बळी गेले, त्यांची जबाबदारी कोण घेणार?

हिंदुस्थानातला दहशतवाद संपलेला नाही आणि सीमेवर जवानांचं हौतात्म्य अजूनही थांबलेले नाही.

– मला वाटतं ट्रम्प मूर्ख आहे. त्यांनी व्हिसावर निर्बंध आणण्यापेक्षा नोटाबंदी केली असती तर हा दहशतवाद संपला असता. ट्रम्पनेसुद्धा शिकायला हवं आमच्याकडून. आज जर्मनीत धोका आहे, फ्रान्सला धोका आहे. सगळय़ांनी नोटाबंदी केली तर दहशतवादी आत्महत्या करून घेतील.

मधल्या काळात मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघाले त्यांच्या काही मागण्यांसाठी आणि आज सगळं शांत झालं. ही महाराष्ट्राच्या मनातली खदखद आहे का?

– महाराष्ट्रातला प्रत्येक समाज जो जो न्याय्य हक्कांपासून वंचित आहे त्यांना मी हेच सांगेन, त्या त्या वेळचे सत्ताधारी हे वेळेची गाजरं दाखवत फसवत आले आहेत, पण आज मात्र जे जे समाज एकवटलेत त्यांनी कृपा करून एकमेकांच्या विरुद्ध उभे न राहता-तसे ते राहिलेले नाहीत, पण सगळे मिळून स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी एकवटले तर सरकारला नमावं लागेल.

पद्मविभूषण काय म्हणताहेत?

– मला एक गोष्ट लक्षात नाही आली. अण्णा हजारे पद्मभूषण आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला. त्यांचं टार्गेट कोण होतं? टार्गेट होते त्यांना पद्मविभूषण आणि लढले त्यांना पद्मभूषण. म्हणजे मला यातला छद्मविभूषण कोण आहे हेच कळत नाहीय. पुरस्कार देणाऱयांमधला छद्मविभूषण कोण आहे?

यात तुम्हाला राजकारण वाटतंय?

– नाही. मला कळून घ्यायचंय, राजकारण आहे का?

तुम्ही त्यांचं अभिनंदन केलं की नाही?

– केलं ना. मी स्वतः अभिनंदन केलं. मी कोत्या मनाचा नाही. मी दिलखुलासपणानं आणि आता नाव घेऊनच सांगतो, मी शरद पवारांचं फोन करून अभिनंदन केलं. त्यांना पद्मविभूषण मिळाल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलंय, पण त्याच्या मागचं गणित काय मला कळलं नाही. मग आपल्या देशात कोणी छद्मविभूषण आहे का? जो हे सगळे खेळ करतोय.

तुम्हाला असं वाटतं का उद्या जर तुम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतलात तर राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देऊन सरकार वाचवेल?

– मला वाटतं मग पद्मविभूषणच्या वरचं जे काय असेल ते त्यांना द्यावं लागेल आणि ते मिळवायचं असेल तर ते तेही करतील.

सध्या मुंबईसह अनेक मनपाच्या हद्दीतले परिवर्तन होणारच अशा प्रकारचे मोठमोठे होर्डिंग्ज मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह झळकलेत.

– मध्यावधी निवडणुका येतायत की काय?

म्हणून विचारतोय परिवर्तन नक्की कुठे होणार आहे?

– मध्यावधी महाराष्ट्रात आणि केंद्रात होतंय की काय?

असं वाटतंय तुम्हाला?

– हो. कारण लोकं आसुसलेत आता परिवर्तनासाठी..

पण ती संधी तुम्ही देणार आहात परिवर्तनाची.

– जर का निवडणुका झाल्या केंद्रात आणि राज्यात तर नक्की देणार. नक्की होणार. केंद्रातसुद्धा सगळं आलबेल आहे अशातला भाग नाही. अनेक लोक तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करताहेत.

म्हणजे कोण?

– भाजपचेच आहेत बरेचसे. त्यांना जे चाललंय ते पटत नाहीच. त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती झालीय त्यांची आता.

कोणी आपल्याला अशाप्रकारचे मेसेज पाठवताहेत का?

– हो. येतातच ना. मेसेज येत असतात, बोलत असतात. आप बराबर कर रहे हैं, लगे रहो, असे सांगत असतात.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर आलीय. शिवसेनेच्या भूमिकेकडे कायम लक्ष राहिलंय

– बघा. आतापर्यंत दोन निवडणुकांमध्ये जी शिवसेनेची भूमिका होती त्यात प्रतिभाताईंचा निर्णय त्याही वेळेला शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसेनेने सांगितला होता. ठासून. नंतर प्रणवजींची जी निवडणूक आली त्यावेळीसुद्धा पक्ष कोणता यापेक्षा माझ्या देशाची प्रतिमा हा प्रश्न महत्त्वाचा मानला. आणि नक्कीच प्रणवजींनी ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. ते निभावताहेत. त्याही वेळेला जी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी शिवसेनाप्रमुखांची झाली होती. त्यांनी सांगितलं, तुम्ही उमेदवार बदला तर मी पाठिंबा देईन. तुम्ही जी व्यक्ती सुचवताय त्यापेक्षा प्रणवदा हे किती तरी योग्य ठरतील आणि मग देशाचा राष्ट्रपती म्हणून देशाची प्रतिमा उंचावणारी व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला मी पाठिंबा देईन.

आता काय भूमिका राहील तुमची?

– हीच माझी भूमिका राहील. पंतप्रधान देशाचा असतो असं मी पंतप्रधानांच्या बाबतीत बोललो, तसे राष्ट्रपती हेसुद्धा देशाचेच असणार. तिकडे तुम्ही पक्षाचा माणूस घुसवू शकत नाही, आणू शकत नाही. आणता कामा नये. केवळ पक्षाचा म्हणून. शेवटी एक गोष्ट नक्की आहे की, सगळे मतदान करतात. याचा अर्थ ते कोणत्या ना कोणत्या पक्षाचे समर्थक असणारच. राज्यपालसुद्धा कोणत्याही पक्षाचा असू नये असा संकेत जरी असला तरी राज्यपालांच्या नेमणुका राजकीय होतात की नाही होत! राजकीय पक्षातल्या बुजुर्गांची सोय तिकडे लावली जाते की नाही? मग निदान एवढा तरी निकष लावा की देशाची मानहानी कुठे होणार नाही, अशी व्यक्ती आम्ही त्या पदावर बसवू.

शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तुम्ही आज अशा शिखरावर नेऊन ठेवली आहे की, आज शिवसेना स्वाभिमानाने पुढे जातेय. एक नवीन दिशा तुम्ही दाखवली आहे. स्वबळाचा नवीन मार्ग दाखवला आहे. हेसुद्धा शिवसेनाप्रमुखांचंच स्वप्न होतं असं मला वाटतं

– नक्कीच होतं. स्वाभिमान हा गुण आम्ही त्यांच्याकडूनच घेतलाय.

तुम्ही रणशिंग फुंकलेलं आहे. हे विजयाचं रणशिंग आहे. तुम्ही मुंबईसह महाराष्ट्राच्या जनतेला आज काय संदेश द्याल?

– मी एवढंच सांगेन, जगायचं तर ते स्वाभिमानाने. कोणाची लाचारी पत्करून जगणं यास काही जगणं म्हणणार नाही. कोणाची मनमानी सहन करून जगणं यासही मी जगणं म्हणणार नाही, असे महापालिकेचा प्रचार करताना सांगतो. मी महापालिकेच्या अखत्यारीतले काम सांगतो. महापालिकेने केलेली कामं आणि महापालिका काय काम करणार ते सांगतो. उगाच काहीतरी जसं शिवस्मारक. हे महापालिकेचे काम नाही, ते राज्य सरकार करतंय. डॉ. आंबेडकरांचं स्मारक राज्य सरकार करतंय. किंबहुना शिवसेनाप्रमुखांचं स्मारकसुद्धा महापौर बंगल्याची जागा जरी असली तरी राज्य सरकार करतंय आणि मग तुम्ही राज्य सरकारची कामं महापालिकेच्या कामात मिक्स करू नका. आम्ही मेट्रो करू, आम्ही तो शिवडी-न्हावा शेवा लिंक करू. ते महापालिकेचं काम नाही. कोस्टल रोड महापालिकेचं काम आहे. महापालिकेच्या कामाव्यतिरिक्त तुम्ही काय सांगणार असाल तर मग मेट्रो काँग्रेसने केली नव्हती? मेट्रो काँग्रेसने पण केली होती. उलट विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांची तयारी झाली होती तरी आपण काँग्रेसला का हरवलं? आणखी जर मागे गेलो तर देशात पहिली रेल्वे आणली ती इंग्रजांनी. मग त्यांना का घालवलं? कामं तर तेव्हा इंग्रजांनीही केली होती. आजही आपण म्हणतो काही गोष्टी, जसं टपाल सेवा ही इंग्रजांनी आणली होती. तरी इंग्रज का नको! का घालवलं त्यांना? काम करत होते ना! पण स्वतःच स्वातंत्र्यावर गदा आणून विकासाची स्वप्नं, भाकड स्वप्नं कोण दाखवत असेल तर आताच वेळ आहे. नाही तर वेळ निघून जाईल. इंग्रज दीडशे वर्षे राहिले होते. अर्थात हे काय दीडशे वर्षे राहत नाहीत. दीड वर्ष राहिले तरी खूप. पण वेळेत सुधारले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होतो. जसा हा नोटाबंदी. वैयक्तिक कुणाचं काय नुकसान झालंय, पण अनेक गोरगरीबांच्या चुली विझल्या आहेत. अनेक कारखाने बंद पडलेत, नोकऱया गेल्या आहेत. आर्थिक विकासास खीळ बसली आहे. ही खीळ कधी खिळखिळी होणार. कधी पुन्हा आर्थिक विकास वेगाने पुढे जाणार. आम्ही ते खरे करेपर्यंत या पिढीचं जे नुकसान होईल, ही पिढी जी बरबाद होईल त्या पिढीचं नुकसान कोण भरून देणार आहे? हे कुणामुळे केलं, कशासाठी केलं? हा जो मनमानी कारभार चालला आहे तो मनमानी कारभार आज खड्डय़ात घालत असेल तर उद्या दरीत फेकून देईल. म्हणून वेळेत शहाणे व्हा. मनमानी आम्ही चालवून घेऊ शकत नाही. हा संदेश देण्याची वेळ जिथे जिथे तुम्हाला येईल तिथे द्या. वेळ आलेली आहे, तुम्ही तो संदेश द्या!

देशातले चित्र काय आहे? प्रत्येक राज्यात जिथे जिथे समर्थ पर्याय जनतेला मिळाला. प्रादेशिक पक्षाच्या रूपात मिळाला. जनतेने दोन्ही राष्ट्रीय पक्षाला नाकारून तो पर्याय स्वीकारला. मग तो दिल्लीत असेल, बिहारमध्ये असेल, बंगालमध्ये असेल. तामीळनाडूत असेल, केरळात असेल. बहुतेक ठिकाणी जनतेने काँग्रेस नको आणि भाजपही नको अशी भूमिका स्वीकारून तिथल्या प्रादेशिक पक्षाला आपले आशीर्वाद दिले आहेत. इतर प्रदेश जर हे करू शकले तर महाराष्ट्र का नाही करणार?

शिवसेनेची कोंडी करणारा अजून जन्माला आलेला नाही आणि आम्ही सत्तेचे लालची नाही. मघाशी मी म्हटलं ना, आम्ही सत्ताधाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी तळमळीने बोलतो आणि लिहितो. त्याचा अर्थ ते जर ‘विरोधक’ म्हणून घेत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, आमचा नाही.

शिवसेना हा एक विचार आहे. नुसती सत्तालोलुपता नाहीए. मला काहीतरी व्हायचंय म्हणून मी लढतोय. मला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून मी लढतोय, मला महापौर व्हायचंय म्हणून लढतोय, मला सरपंच पण व्हायचंय, मला पंतप्रधान पण व्हायचंय ही सत्तालोलुपता आहे ना, तशी सत्तालोलुपता शिवसेनेत नाही.

-(समाप्त)

                                                 

आपली प्रतिक्रिया द्या