हिंगोलीत आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन; वसमतला बसस्थानकाचे भुमिपूजन

633

हिंगोली शहरापासून जवळ असलेल्या देवाळा रोड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उद्या १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे परिवहनमंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते केले जाणार आहे. यासोबतच वसमत येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या आधुनिक बसस्थानकाच्या बांधकामाचे भुमिपूजनही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते होणार आहे.

महाराष्ट्रातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी परिवहनमंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ५ कोटी ८५ लाख ४१ हजार रुपयांचा निधी परिवहनमंत्री रावते यांच्यामुळे मंजुर झाला. या इमारतीचे बांधकाम पुर्णत्वात आले असून उद्या १४ ऑगस्ट रोजी लोकार्पण व उद्घाटन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते होणार आहे.

वसमतमध्ये सुमारे ३५ वर्षापुर्वी पासून असलेल्या बसस्थानकाच्या जागेवर नुतनीकरण व अद्ययावत बसस्थानकाच्या बांधकामासाठी शिवसेनेचे माजी सहकारमंत्री तथा आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ९ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या बसस्थानकात पहिल्या ग्राउंड फ्लोअरवर १२ फलाट, वाहतुक नियंत्रण कक्ष, आरक्षण व पास कक्ष तसेच ईतर सुविधा राहणार असून पहिल्या मजल्यावर छोट्या व्यावसायीकांना रोजगारासाठी भाडे तत्वावर गाळे उपलब्ध होणार आहेत. या बसस्थानक नुतनीकरण कामाचे भुमिपूजन देखील दिवाकर रावते यांच्या हस्ते होणार आहे.

हिंगोली व वसमत येथे होणाऱ्या या कार्यक्रमांना पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, विप्लव बोजोरी, रामराव वडकुते, सतीश चव्हाण, विक्रम काळे, रा.प. मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओळ, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि.प. सीईओ एच.पी. तुम्मोड, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, प्रधान सचिव आशीषकुमार सिंह हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य परिवहन मंडळ व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या