शीव रुग्णालयात कोरोनाबाधित दीड महिन्याच्या चिमुकल्यावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

551

महापालिकेच्या शीव रुग्णालयातील जिगरबाज डॉक्टरांनी अवघ्या दीड महिन्याच्या कोरोनाबाधित चिमुकल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला आहे. विशेष म्हणजे हे बाळ कोरोनाबाधित असूनही डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून शस्त्रक्रिया केली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी ही माहिती दिली.

सुरुवातीला सर्दी, खोकला, ताप असल्यामुळे या बाळाला पालिकेच्या शीव रुग्णालयात 13 मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याची कोरोना टेस्टही करण्यात केली. यामध्ये हे बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. असे असताना बाळावर लक्षणांनुसार उपचारही सुरू होते. मात्र, बाळाच्या प्रकृतीत आवश्यक त्या प्रमाणात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे सिटीस्कॅन करण्यात आले. यामध्ये यामध्ये रक्त साखळण्याची प्रक्रिया विलंबाने होत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय मेंदूमध्ये गाठीही दिसल्या. तसेच त्याच्या टाळूला सूजही दिसत होती. त्यामुळे त्याच्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. मात्र बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे शस्त्रक्रिया कशी करणार असाही प्रश्न होता. मात्र, डॉक्टरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता न्यूरोसर्जन, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, नर्सच्या पथकाने बाळावर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

मध्यरात्री 3 वाजता, दोन तास शस्त्रक्रिया
सिटीस्कॅननंतर बाळाच्या मेंदूमध्ये असलेल्या डिफिकल्टीज समोर आल्यामुळे वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यामुळे सहा डॉक्टरांच्या टीमने रात्री 3 वाजता दोन तासांची शस्त्रक्रिया पार पाडली. यावेळी ‘आयसीएमआर’च्या गाइडलाइननुसार डॉक्टरांच्या सुरक्षेसाठीही आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्यात आल्या होत्या. तरीदेखील संबंधित शस्त्रक्रियेत सहभागी झालेल्या डॉक्टरांसह इतर सहाय्यकांना काही काळ देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांची प्रकृतीही ठीक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

बाळ कोरोनाबाधित असले तरी शस्त्रक्रियेनंतर आता त्याच्या प्रकृती स्थिर आहे. पेडियाट्रिक विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. औषधोपचारालाही बाळ चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे येत्या पाच ते सहा दिवसांनी पुन्हा त्याची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
– डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, शीव रुग्णालय

आपली प्रतिक्रिया द्या