
वाशी तालुक्यातील इंदापूरमध्ये 2 ठिकाणी सुमारे साडेतीन क्विंटल अफू सापडल्याने तसेच परिसरात अफूची शेती होत असल्याने खळबळ उडाली आहे. वाशी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या धाराशिवच्या पथकाने छापा टाकून परिसरातील नरसिंह वेताळ यांच्या शेतात अडीच क्विंटल अफू पकडली. तसेच इंदापूर ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून सुमारे 100 मीटर परिसरातच विश्वंभर पारडे यांच्या शेतात साधरणत: दीड क्विंटल अफू आढळून आली आहे. त्यांच्यावर एमडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच परिसरातील कोणत्याही शेतकऱ्याकडे अफू आढळली तर कडक कारवाई करण्यात येईल, असे वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खनाळ यांनी सांगितले.
इंदापूर परिसर हा कांदा पीकासाठी ओळखला जातो. त्यामुळे कांद्याचे फुल जेव्हा फुलोऱ्यात असते तेव्हा त्याखाली अफूचे फुल लपले जाते. असा विचार करून या शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकात अफूची शेती केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने ही कारवाई केली. अफूची आढळलेली शेती जिल्हा परिषदेच्या शाळेपासून हाकेच्या अंतरावर आहे. ही अफूची शेती सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व्यक्त होत आहे.
धारीशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अप्पर पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पीएसआय निंबाळकर , स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय शैलेश पवार , सहपोलीस निरीक्षक निलंगेकर , पोलीस हवालदार प्रदीप, पोलीस नायक बबन जाधवर , पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र आरसेवाड , गणेश सर्जे , चालक गोरे यांनी ही कारवाई केली.