पीयूष गोयल यांच्याविरोधात विरोधी पक्षांकडून राज्यसभेत विशेषाधिकाराची नोटीस दाखल

नव्याने स्थापन झालेल्या विरोधी पक्षांची आघाडी I.N.D.I.A ने मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात राज्यसभेत असंसदीय शब्दांचा अवलंब केल्याबद्दल विशेषाधिकार नोटीस दिली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आरोप केला की, वरच्या सभागृहाचे नेते असलेले गोयल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचा उल्लेख ‘देशद्रोही’ म्हणून केला.

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले की जयराम रमेश त्यांना त्यांच्या केबिनमध्ये भेटले आणि पीयूष गोयल यांनी वरच्या सभागृहातील भाषणादरम्यान असंसदीय शब्द वापरल्याचं सांगितलं होतं. हा शब्दप्रयोग तपासून सभागृहाच्या रेकॉर्डमधून काढून टाकू, असे धनकड म्हणाले.

ज्या पक्षांच्या नेत्यांनी नोटीस दिली आहे त्यामध्ये काँग्रेस, टीएमसी, आप, आरजेडी, डीएमके, आरजेडी, जेडीयू, एनसीपी आणि डावे पक्ष आहेत.

दरम्यान, जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हंटलं आहे की, ‘आज दुपारी एक वाजता, राज्यसभेतील भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षांना ‘देशद्रोही’ म्हणून संबोधित केलं आहे. तसेच सभागृह नेते पीयूष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव सादर केला. सभागृहात त्यांनी माफी मागितली पाहिजे, त्यापेक्षा कमी काही स्वीकारार्ह होणार नाही.’

रमेश पुढे म्हणाले, ‘विरोधी पक्षांनी आज उर्वरित दिवस राज्यसभेतून वॉकआउट केले कारण: 1. मणिपूरवर त्वरित चर्चेला परवानगी देण्यास मोदी सरकारचा सतत नकार. 2 सभागृह नेते पियुष गोयल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह टिकेबद्दल माफी मागण्यास सतत नकार देणे’.

यानंतर, विरोधी पक्षातील इतर सदस्यांनी भाजप ज्येष्ठ नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

नंतर सभागृहात, पियुष गोयल म्हणाले की ते संसदीय सभ्यतेत बसू शकत नाहीत असे कोणतेही शब्द मागे घेत आहेत आणि ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याची विनंती त्यांनी अध्यक्षांना केली.