मॅजिस्ट्रेट भेटायला येणार म्हणून मंजुळाला बाथरूममध्ये कोंडले, बराकीत ठार मारले!

34

सामना प्रतिनिधी, मुंबई

दोन अंडी आणि पाच पावांमुळे नाही तर वेगळयाच कारणासाठी मंजुळाला संपवले याचा भायखळा तुरुंगातील महिला कैद्यांनी सांगितलेला ‘आँखो देखा हाल’ आज महिला आमदारांनी विधान परिषदेत मांडला. मॅजिस्ट्रेट भेटायला येणार म्हणून मंजुळाला तोंडात साडीचा बोळा कोंबून बाथरूममध्ये कोंडले गेले होते आणि मॅजिस्ट्रेट निघून जाताच तिला बराकीत आणून ठार मारले. अंगावर काटा आणणारा हा घटनाक्रम ऐकताच सभागृह हेलावले.

यासंदर्भात काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी भायखळा तुरुंगातील भेटीत तेथील महिला कैद्यांनी दिलेली माहिती सभागृहात सांगितली. त्या म्हणाल्या, भायखळा तुरुंगातील कैद्यांशी आपण प्रत्यक्ष संवाद साधला तेव्हा मंजुळा प्रकरणातील गांभीर्य जाणवले. २३ जून रोजी दुपारी मंजुळाला भेटायला महानगर दंडाधिकारी पूरकर हे येणार होते. तशी नोंद तुरुंगाच्या व्हिजिटर बुकमध्येही आहे. दंडाधिकारी येण्यापूर्वी मंजुळाला तुरुंग अधिकारी पोखरकर आणि अन्य पाच महिला कर्मचाऱ्यांनी साडीचा बोळा तोंडात कोंबून बाथरूममध्ये कोंडून ठेवले. कदाचित ती दंडाधिकाऱ्यांना तुरुंगातील अत्याचारांबद्दल माहिती देणार होती. त्यामुळेच दंडाधिकाऱ्यांशी तिची भेट घडू दिली गेली नाही. दंडाधिकारी जाताच तिला बाथरूममधून खेचत बाहेर आणले गेले. तिला फरफटत पाच नंबरच्या बराकीत नेण्यात आले आणि अन्य कैद्यांसमोर सहा जणींनी तिला बेदम मारहाण केल्याची माहिती तेथील महिला कैद्यांकडून मिळाल्याचे आमदार खलिफे यांनी सांगितले.

मोबाईलच्या लाइटवर साक्षीदारांना मारहाण
मंजुळाचा मृत्यू २३ जूनला झाला. त्यानंतर २४ जूनला रात्री तुरुंगाधिकारी इंदलकर यांनी मंजुळाची मारहाण पाहणाऱ्या सर्व कैद्यांना मोबाईलच्या उजेडात कैद्यांवर लाठीमार केला. त्यात एका कैदी महिलेचा हातही फ्रॅक्चर झाला, अशी माहिती आमदार खलिफे यांनी दिली.

शौचालयातील पाणी प्यावे लागते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह आपण बराकींची पाहणी केली तेव्हा तिथे पिण्यासाठी पाणी ठेवायचे बॅरेल रिकामीच होते. कैद्यांना शौचालयातील नळांमधून येणारे पाणी प्यावे लागते. मुस्लिम महिला कैद्यांना तर ‘रोजा’च्या काळातही पिण्याचे पाणी दिले गेले नाही, अशी व्यथा कैद्यांनी मांडल्याचे आमदार खलिफे यांनी सभागृहाला सांगितले.

सूत्रधार सरकारमध्येच, न्यायालयीन चौकशी करा!
मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाचा सूत्रधार सरकारमध्येच असल्यामुळे सरकार आरोपींची पाठराखण करत असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. भायखळा तुरुंगात ही घटना घडली तेव्हा तुरुंगाधिकारी असलेले इंदळकर यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. इंदळकर नसताना प्रभारी तुरुंगाधिकारी म्हणून काम करणारे घरबुडवे यांनी मंजुळाला वेळेवर उपचारासाठी न नेल्याने तिचा मृत्यू झाला. त्याबद्दल घरबुडवे यांनाही निलंबित करण्यात यावे, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या