इतर राज्यांचे भले करणारे महाराष्ट्रद्रोही सरकार!

 

राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थान विदर्भातून गुजरातला गेले. फॉक्सकॉन तुमच्या डोळ्यादेखत गुजरातमध्ये गेला, बल्क ड्रग पार्क केंद्र सरकारने महाराष्ट्राला नाकारला, ऑरिक सिटीमधील वैद्यकीय उपकरणांचा प्रकल्पही गेला. विदर्भातील नागपूरमधील टाटा एअरबस प्रकल्प सुध्दा गुजरातला आणि  नागपूरमधील सॅफ्रन प्रकल्पही हैदराबादला गेला. या सरकारची चार महिन्यांची कामगिरी काय, असे कोणी विचारले तर महाराष्ट्राचे नुकसान आणि इतर राज्यांचे भले करणारे हे महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, असेच म्हणावे लागेल अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे वर्णन केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना तुफान टोलेबाजी केली. मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांना जोरदार टोले हाणले.

सुटाला उंदीर लागेल

शिंदे फडणवीस गटातील इच्छुक आमदारांनी शपथविधी सोहळ्यासाठी सूट शिवले आहेत. अजित पवारांचे भाषण सुरु असताना भरत गोगावले मध्येच बोलले तेव्हा त्यांच्याकडे बघत, गोगावले साहेब आपला तो सूट शिवून आणलेला कधी घालणार, खूप जणांचे सूट वाया चालले आहेत. उंदीर लागतील असे सांगताच हास्याचा स्फोट झाला.

घरी येऊन वहिनींनाच सांगतो

मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही नामुष्की, महिलांचा अपमान आहे अशी टिका करताना, ते म्हणाले की, तुम्ही सांगता भाजपला महिलांची मते मिळाली पण मंत्रिमंडळात एक महिला आपल्याला सापडत नाही. अरे का कुठला कारभार, आता मी घरी येऊन वहिनींना सांगणार आहे – बघा हो यांच्याकडे रात्री. त्यांनी मनावर घेतले की लगेच एखादी महिला मंत्री होईल याची मला खात्री आहे असे देवेंद्र फडणवीस यांना उल्लेखून म्हणताच सभागृहात एकच हशा उसळला.