खोटारडय़ा घोषणा करून भाजप सरकार शेतकऱयांना रडवतेय; विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा घणाघात

 बार्शी येथील शेतकऱयाला कांदा विकल्यानंतर आडत खर्च जाऊन दोन रुपयांचा चेक मिळाला. शेतकऱयाची ही बिकट स्थिती सरकार उघडय़ा डोळ्याने बघतंय, पण भूमिका घेत नाही. शेतकऱयांच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार नुसत्या खोटारडय़ा घोषणा करीत त्यांना रडवत असल्याचा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शुक्रवारी नगर जिह्याच्या दौऱयावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, संजय शेंडगे, युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक योगिराज गाडे, आशा निंबाळकर, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, संदीप दातरंगे आदी उपस्थित होते.

अंबादास दानवे म्हणाले, ‘‘कांदा, कापूस, संत्री यांच्या खरेदीत सरकारचे धोरण परस्परविरोधी आहे. सरकार कांद्याची निर्यात करीत नाही. दुसरीकडे कापूस आयात करणे बंद करत नाही. मागील वर्षी जुन्नर येथील एका शेतकऱयाने कांद्याला भाव मिळत नाही म्हणून पंतप्रधानांच्या वाढदिवशीच त्यांना पत्र लिहून आत्महत्या केली. मात्र, त्यानंतरही सरकारला जाग आलेली नाही. राज्यात खासदार, आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. कालच पाथर्डीत व्यापाऱयावर हल्ला झाला, तर नगरमध्ये खुनाची घटना घडली असून, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. मात्र, राज्य सरकार समाजकारणापेक्षा राजकारणात गुंतले आहे,’’ असेही ते म्हणाले.

‘निष्ठावंतांची भूमी’ म्हणून महाराष्ट्राची ओळख राहावी

पाथर्डी – महाराष्ट्राच्या भूमीची ओळख ही गद्दारांची भूमी नाही, तर ‘निष्ठावंतांची भूमी’ म्हणून येथून पुढील काळात ओळखली जावी, असे साकडे आपण मोहटादेवीच्या चरणी घातल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. दानवे यांनी आज मोहटादेवी व भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पक्ष चिन्ह व नाव गेल्याने काही फरक पडत नाही. आजही महाराष्ट्रातील जनता ही ठाकरे परिवाराच्या मागे ठामपणे उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा भरारी घेणार आहोत. प्रामाणिक मुख्यमंत्री कसा असतो, हे उद्धव ठाकरे यांनी देशाला दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले.